भारत-पाकिस्तान संबंधात कमालीचा तणाव निर्माण झाला असताना मिकाने कराचीतल्या एका अब्जाधीशाच्या मुलीच्या लग्नात परफॉर्म केले होते. संबंधित पाक अब्जाधीशाचे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे म्हटले जात होते. हा लग्नसोहळा ८ ऑगस्ट रोजी पार पडला होता. त्यानंतर मिका सिंगचे भारतात परतणे थोडे कठीण होऊन बसले होते.

पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवर बंदी घातली असताना मिकाने पाकिस्तानात जाऊन परफॉर्मन्स दिल्याने सर्वच स्तरांतून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यातच ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ने (AICWA) मिकावर बंदी घालत त्याला चित्रपटसृष्टीतून बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मिका सिंग भारतात परताच त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिका सिंग ‘भारत माता की जय’ अशा घोषणा करताना दिसत आहे.

मिका सिंगने स्वातंत्र्य दिनानिमित्त एक व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये मिका ‘भारत माता की जय’ अशी घोषणा करताना दिसत आहे. मिका पाकिस्तानाहून परतत असल्याचे व्हिडीओवरुन स्पष्ट झाले आहे. ‘भारत माता की जय, माझे अशा प्रकारे स्वागत केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि जवानांना माझा सलाम. जवान कधीच कोणता उत्सव आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करत नाहीत कारण ते आपली रक्षा करण्यात व्यग्र असतात’ असे मिकाने ट्विटमध्ये लिहिले आहे.