24 February 2021

News Flash

गृहितकांना झिरो करणारे वर्ष..

खरोखरच या वर्षांत असं नक्की काय घडलं ज्याकडे चित्रपटसृष्टीला नवीन वर्षांत प्रवेश करताना कानाडोळा करता येणार नाही, त्यावर टाकलेली नजर..

(संग्रहित छायाचित्र)

स्वप्निल घंगाळे

भूतकाळातून शिकावे आणि भविष्याकडे चालत राहावे असं म्हणतात. नवीन वर्ष अवघ्या काही तासांवर आले आहे. असं असताना बॉलीवूडला खरोखरच या म्हणीचा अर्थ समजून घेत पुढील वर्षी आपली वाटचाल अधिक स्पष्टपणे आणि नवीन परिमाणांचा आधार घेऊन करावी लागणार आहे. २०१८ हे वर्ष खऱ्या अर्थाने बॉलीवूडसाठी धडा शिकवणारं ठरलं आहे. या वर्षांने चित्रपटसृष्टीला एका अर्थाने आरसा दाखवत काय चुकतंय याची जाणीव अगदी तिकीटबारीपासून समाजमाध्यमांपर्यंत सगळीकडे करून दिली. यापूर्वी पाहिले नव्हते असे अनेक महत्त्वाचे बदल आणि घटना यंदाच्या वर्षी बॉलीवूडने पाहिल्या. खरोखरच जगातील सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या बॉलीवूडसाठी हे वर्ष दिशादर्शक ठरले आहे. पण खरोखरच या वर्षांत असं नक्की काय घडलं ज्याकडे चित्रपटसृष्टीला नवीन वर्षांत प्रवेश करताना कानाडोळा करता येणार नाही, त्यावर टाकलेली नजर..

*  कमी खर्च पण कथेला अर्थ

वर्षांला शेकडोच्या संख्येने चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या बॉलीवूडमध्ये यावर्षीही अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये मल्टीस्टारर चित्रपट, मोठय़ा बजेटचे चित्रपट, सिक्वेल्स, रिमेक अशा सर्वच प्रकारच्या सिनेमांचा समावेश होता. मात्र यंदाचे वर्ष गाजवले ते कमी खर्चात तयार करण्यात आलेल्या पण वेगळ्या धाटणीच्या आशयघन चित्रपटांनी. मागील वर्षांतील असे मोजके चित्रपट सांगायचे झाल्यास राझी, अंधाधून, बधाई हो, स्त्री, गाझी अटॅक, सोनू के टिटू की स्वीटी यासारख्या चित्रपटांनी केवळ कथानकाच्या जोरावर शंभर कोटींहून अधिकचा गल्ला कमवला. याशिवाय तुंबाड, केजीएफ, परमाणू, पिहू, मुल्क या वेगळे कथानक असणाऱ्या चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटांनी केवळ बडय़ा कलाकारांऐवजी कथानकाच्या आधारे चित्रपट प्रेक्षकांना आवडू शकतो हे सिद्ध केलं.

*  नाम बडे दर्शन खोटे

कमीत खर्चात भाव खाऊन गेलेल्या चित्रपटांनी एकीकडे दणक्यात कमाई केली, तर दुसरीकडे बडे कलाकार असणारे बिग बजेट चित्रपट अक्षरश: तोंडावर आपटले. यामध्ये रेस थ्री, ठग्स ऑफ हिंदोस्तान, झिरमे या तिन्ही खान मंडळींच्या चित्रपटांचाही समावेश होता हे विशेष. याशिवाय हॅपी फिर भाग जाऐगी, साहेब बिवी और गॅंगस्टर ३, विश्वरूपम २, लव्ह यात्री, नमस्ते लंडन, फन्नो खान, गोल्ड, १०२ नॉट आऊ ट, हेलिकॉप्टर इला, बत्ती गुल मीटर चालू, मनमर्झिया, अय्यारी, भावेश जोशी सुपरहिरो या चित्रपटांनाही अपयशाला सामोरे जावे लागले. मोठे बजेट, चांगले कलाकार असूनही या चित्रपटांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

*  खानावळीचे अपयश

सलमान खान, शाहरुख खान किंवा आमिर खान या तिघांपैकी एखाद्याला चित्रपटामध्ये घ्या आणि तुमचा चित्रपट यशस्वी झालाच म्हणून समजा असे काहीसे समीकरणच मागील काही वर्षांमध्ये तयार झाले होते. मात्र २०१८ मध्ये प्रेक्षकांनी या तिन्ही खानांकडे पाठ फिरवली. सलामानचा मल्टीस्टारर रेस थ्री, आमिर खानच्या जोडीला अमिताभ बच्चन, कतरिना कैफ सारख्या कलाकारांना घेऊ न तयार केलेला ठग्स ऑफ हिंदोस्तान तसेच नुकताच प्रदर्शित झालेला शाहरुखचा झिरो हे  चित्रपट तिकीटबारीवर चांगलेच आपटले. केवळ बडे कलाकार असल्याने प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये येण्याचे दिवस कालबाह्य़ झाले असंच यामधून दिसून येतं. असं असलं तरी रजनीकांत यांची जादू या फिक्या पडत चाललेल्या स्टारडमच्या लाटेतही टिकून आहे हे विशेष. रजनीकांत यांचा काला आणि २.० दोन्ही चित्रपटांनी चांगली कमाई केली आणि या यशामागे मुख्य कारण म्हणजे एकच रजनीकांत.

*  नवेयत पण छावेयत   

या वर्षभराचा आढावा घेतल्यास जत्रा सिनेमामधील हाच संवाद मोजक्या अभिनेत्यांना अगदी चपखल बसतो. त्यातही अभिनेत्रींपेक्षा यंदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्यांची संख्या जास्त आहे. यामध्ये आयुषमान खुराना, विकी कौशल, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी यांची नावं घेता येतील. या सर्वानीच या वर्षी केलेल्या चित्रपटांमध्ये साकारलेल्या जवळजवळ सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. या चेहऱ्यांना इतकं यश मिळालंय की त्यांनी मानधनाचा आकडा वाढवला आणि तो ऐकून करण जोहरच्या पोटातही गोळा आला. नवीन आलेल्यांमध्ये सारा अली खानचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. वर्षांखेरीस प्रदर्शित झालेल्या केदारनाथ आणि झिरो या दोन्ही चित्रपटांमधून तिने अगदी दणक्यात आपलं नाणं खणखणीत वाजतंय हे दाखवून दिलं आहे.

*  मी टू

या वर्षी मनोरंजन सृष्टीने चित्रपटांबरोबरच समाजामध्ये होणाऱ्या महिलांच्या शोषणांसंदर्भातील विषयाला वाचा फोडली. चित्रपट सृष्टीमधून सुरू झालेले हे वादळ नंतर अनेक क्षेत्रांमध्ये आले. अगदी प्रसारमाध्यमे, शैक्षणिक संस्था, क्रीडा, राजकारण या सर्वच क्षेत्रांमधील स्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला मी टू च्या माध्यमातून वाचा फोडली. या मोहिमेमुळे केवळ कास्टिंग काऊ चच्या नावाखाली होणाऱ्या चर्चाचे गंभीर स्वरूप जागासमोर आले.

*  नायिकाप्रधान चित्रपटांना पसंती

चित्रपट म्हटलं की नायक आणि त्या नायकाच्या आजूबाजूला गाण्यामध्ये या झाडांमधून त्या झाडामागे पळत पळत नाचणारी नायिका हे चौकटीतील साचेबद्ध विचार चित्रपट सृष्टीतून हळूहळू हद्दपार होताना दिसत आहेत. अनेक वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांमध्ये नायिका मध्यवर्ती भूमिका बजावताना दिसते आहे. असे चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात यावर यावर्षी शिक्कामोर्तब झालं असंच म्हणावं लागेल. राझी, मुल्ख, स्त्री, विरे दी वेडिंग, हिचकी, परी, लिपिस्टक अंडर माय बुरखा या  चित्रपटांचा यात समावेश आहे.

*  नेटफ्लिक्स आणि प्राइमचा परिणाम

यावर्षी बॉलीवूडने एक स्मार्ट पाऊ ल उचलल्याचे दिसले. चित्रपटगृहांमधून चित्रपट उतरवल्यानंतर लगेचच तो ऑनलाइन डिजिटल पार्टनर्सच्या माध्यमातून प्रदर्शित करून सामान्यांना उपलब्ध करून द्यायचा. अनेक चित्रपट तर चित्रपटगृहातून उतरवल्यानंतर अवघ्या एक ते दोन दिवसांमध्ये ऑनलाइन स्ट्रीमिंग साइट्सवर दिसू लागले. चित्रपटगृहामधून चित्रपट उतरल्यावर तो पायरेटेड माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याऐवजी तो ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पाहिला जावा या उद्देशाने पायरसीला आळा घालण्यासाठी ही युक्ती वापरली जात असून तिचा फायदाही होताना दिसतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 1:54 am

Web Title: years rehearsing of the hypotheses
Next Stories
1 मराठीला ‘अच्छे दिन’
2 बेतीव संशयकल्लोळ : तिला काही सांगायचंय!
3 चित्र रंजन : ‘सिम्बम’फुल मनोरंजन!
Just Now!
X