बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि आयुष शर्माचा ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दोघेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटातील आयुष शर्माच्या लूकचे सर्वचजण कौतुक करत आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी आयुष शर्माला त्याच्या लूकवरुन ट्रोल झाला होता. यामुळे त्याला टीकाही सहन करावी लागली होती. नुकतंच त्याने ‘लवयात्री’ या चित्रपटादरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला आहे.

‘लवयात्री’ या चित्रपटात आयुष शर्मा प्रमुख भूमिकेत झळकला होता. मात्र त्यावेळी त्याच्या लूकवर अनेक कमेंट्स करण्यात आल्या होत्या. आरजे सिद्धार्थ काननच्या शोमध्ये त्याने याबाबतचा खुलासा केला आहे. यावेळी तो म्हणाला की, “माझ्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी माझ्यावर प्रचंड टीका केली होती. मात्र मी त्या सर्व कमेंट्स सकारात्मकपणे घेतल्या. विशेष म्हणजे या सर्व टीका मी वॉलपेपर म्हणून सेव्ह करुन ठेवल्या होत्या, असेही त्याने सांगितले.

‘लवयात्री’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आदल्या रात्रीपासून या चित्रपटाचे रिव्ह्यू येण्यास सुरुवात झाली. यातील पहिली कमेंट ही एका प्रसिद्ध रिपोर्टरची होती. त्यात असे म्हटलं होते की ‘मी मुलींसारखा दिसतो’. तर काहींनी सांगितले होते की ‘भावनिक दृश्यांमध्ये फार कमजोर आहे’. तसेच काहींनी सांगितले की ‘चित्रपटातील संवाद बोलण्यात अडचण आहे’. इतकंच नव्हे तर काहींनी ‘स्क्रीन प्रेझेन्स नाही’, अशीदेखील कमेंट केली होती.

हेही वाचा : ‘मेहनत करो भाई’, सलमानचा तरुण कलाकारांना सल्ला

“माझ्यात ज्या गोष्टींची कमतरता आहे असे लोकांना वाटते त्या सर्व गोष्टींवर मी काम करेन. जेणेकरून पुढच्या वेळी लोकांना माझ्याबद्दल असे वाटू नये, असे मी कमेंट वाचल्यानंतर ठरवले होते. यानंतर मी या सर्व कमेंट एका नोटपॅडवर लिहिल्या होत्या. त्याचे मी एक वॉलपेपर बनवले होते. यात मला डायलॉग डिलिवरी येत नाही, अशी कमेंट होती. यानुसार मी त्यावर काम केले. तसेच यापुढे मी जेव्हा जेव्हा भावनिक दृश्य चित्रित करेन त्यावेळी मी हे करेन, असे ठरवले, असे त्याने म्हटले.

दरम्यान आयुष शर्माचा ‘लवयात्री’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यात आयुष शर्मासोबत वारिना हुसैन झळकली होती. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. लवकरच आयुष हा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यात सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.