‘८३’ चित्रपटामधील त्याची भूमिका, ‘पानी’ या त्याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, त्यानंतर ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील त्याची नेहमीपेक्षा वेगळी भूमिका.. या सगळय़ामुळे अभिनेता आदिनाथ कोठारे हे नाव सध्या चर्चेत आहे. नुकताच ‘झी झेस्ट’वरचा ‘कोकण डायरीज’ या त्याच्या पर्यटनावर आधारित शोलाही चांगला प्रतिसाद मिळाला. एकूणच २०२२ हे वर्ष अभिनेता म्हणून वैयक्तिकरीत्या आपल्यासाठी चांगलं होतंच, पण या काळात मराठी चित्रपटाला मिळालेलं यशही उल्लेखनीय असून मराठी चित्रपट स्वतंत्रपणे बहरतो आहे, याबद्दल आदिनाथने आनंद व्यक्त केला.
‘झी झेस्ट’चा ‘कोकण डायरीज’ हा सर्वार्थाने त्याच्यासाठी वेगळा अनुभव होता, असं आदिनाथने सांगितलं. या शोच्या माध्यमातून आदिनाथने चाहत्यांना कोकणातील कला, तिथलं खाणं, संस्कृती यांचं दर्शन घडवलं आहे. ‘‘अनेकदा आपण नवनव्या जागांना, शहरांना भेटी देतो, त्या पाहायला जातो. मात्र आपण तिथे नुसतेच भटकंती करत असतो, ती जागा जगणं राहून जातं कित्येकदा.. या शोच्या माध्यमातून मी पहिल्यांदा कोकण जगलो आहे,’’ अशी भावना त्याने व्यक्त केली. कोकणातली लोप पावत चाललेल्या दशावतारी कलेची माहिती देताना त्याने पहिल्यांदाच दशावतारी नाटकात कामही केले. ‘‘सावंतवाडी शहराच्या बाहेरच्या बाजूला एका गावात देवाच्या जत्रेच्या निमित्ताने दशावतारी नाटकाचा प्रयोग रंगणार होता. आम्ही गेलो तेव्हा तिथे दशावतारी नाटकातील कलाकारांची तयारी सुरू झाली होती. ते स्वत:च स्वत:ची रंगभूषा, वेशभूषा करण्यात गढले होते. मुळात दशावतारी हा एक भन्नाट प्रकार आहे. याची संहिता अर्धीच लिहिलेली असते. अनेकदा तर व्यक्तिरेखा स्पष्ट असतात आणि त्यांचा विंगेतून होणारा प्रवेश आणि बाहेर पडणं या दोनच गोष्टी लिहिलेल्या असतात. बाकी सगळं हे कलाकार तिथल्या तिथे नाटक उभं करतात. एकदा कलाकाराने रंगभूमीवर आपापल्या व्यक्तिरेखेनुसार प्रवेश घेतला, की तो त्याचे मोठमोठाले संवाद, गाणं, क्वचित युद्धप्रसंग या सगळय़ा गोष्टी पूर्ण करूनच कलाकार विंगेत परततात. हे नाटक रात्री कधी २ तास, कधी ७ तास, तर कधी पूर्ण रात्र सुरू असतं,’’ अशी सगळी माहिती भरभरून देणाऱ्या आदिनाथने दशावताराचा स्वत: घेतलेला अनुभवही सांगितला. या कलाकारांबरोबर बोलत असताना आदिनाथलाही त्यांनी या नाटकात भूमिका करावी, अशी गळ घातली. मात्र आपल्याला अशा पद्धतीने सहज-स्वयंस्फूर्त पद्धतीने दशावतारी भूमिका साकारता येईल का याबाबत साशंक असलेल्या आदिनाथने सुरुवातीला ही भूमिका करण्यास नकार दिला. ‘‘मी त्यांच्यासारखाच स्वत:ची रंगभूषा करायचा प्रयत्न केला आणि तयार झालो. मी ब्रह्मराक्षसाची भूमिका करावी अशी त्यांची इच्छा होती. मी अभिनेता आहे, त्यामुळे मला हे सहज जमू शकेल हे त्यांनी मला पटवून दिलं आणि भूमिकेसाठी तयारही केलं. मी रंगभूमीवर गेलो आणि ब्रह्मराक्षसाची भूमिका करून जेव्हा खाली उतरलो तेव्हा अक्षरश: मला भरून आलं होतं. खरं तर ही भूमिका करण्यापूर्वी मी त्या कलाकारांना प्रश्न विचारले होते. या दशावतारी कलेतून तुम्हाला पुरेसे पैसे मिळत नाहीत. तुमचा चरितार्थ या कलेवर चालणं अवघड आहे आणि तरीही तुम्ही ही लोककला कशी टिकवून ठेवली आहे? त्यांना विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर माझंच मला मिळालं आणि मी शांत झालो.’’ अशा शब्दांत आदिनाथने आपला अनुभव कथन केला.
‘८३’ आणि ‘चंद्रमुखी’नंतर हिंदी आणि मराठी दोन्ही ठिकाणी आपल्याला उत्तम काम आणि भूमिका मिळू लागल्या आहेत, असंही त्याने स्पष्ट केलं. गेल्या वर्षी ‘क्रिमिनल जस्टिस’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’सारख्या वेबमालिका केल्यानंतर यंदाही तो सुधीर मिश्रांबरोबर दोन वेबमालिकांवर काम करत असल्याची माहिती त्याने दिली. एका वेबमालिकेत तो तापसी पन्नूबरोबर काम करतो आहे, तर सुधीर मिश्रांच्या दुसऱ्या वेबमालिकेत साकेत सलीम आणि अन्य कलाकार आहेत. याशिवाय, त्याने दिग्दर्शित केलेला आणि प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला ‘पानी’ हा चित्रपटही या वर्षी चित्रपटगृहांतून प्रदर्शित होणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करणार असल्याचं त्याने सांगितलं. अभिनेत्री माधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या ‘पंचक’ चित्रपटातही त्याची मुख्य भूमिका असून लवकरच त्याच्याही प्रदर्शनाची तारीख जाहीर होणार असल्याचं आदिनाथने सांगितलं.
मराठी चित्रपटसृष्टी हिंदीच काय कोणत्याही अन्य चित्रपटसृष्टीच्या छायेखाली वाढते आहे असं म्हणणं अयोग्य आहे. मराठी चित्रपटांसाठी सध्याचा काळ हा खूप चांगला आहे. ते स्वतंत्रपणे बहरत आहेत. एका सर्वसाधारण मराठी चित्रपटाच्या कमाईची तुलना हल्ली थेट बॉलीवूडपटांच्या कमाईशी केली जाते असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. नुकतीच रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने ७० कोटींहून अधिक कमाई केली. ‘चंद्रमुखी’ने २० ते २५ कोटी कमाई केली, ‘धर्मवीर’ने ४०-५० कोटी पार केले, ‘पावनिखड’ चित्रपटाने ३०-३५ कोटींची कमाई केली. एकंदरीत मराठी चित्रपटांचे उत्पन्न पाहता सहजपणे दीडशे ते दोनशे कोटींहून अधिक उलाढाल आहे. प्रादेशिक चित्रपटांसाठी ही आर्थिक कमाई फार महत्त्वाची आहे.
आदिनाथ कोठारे