चेहऱ्यावरील विनोदी हावभावाच्या जोरावर आणि आपल्या परिपूर्ण अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. अशोक सराफ हे सर्वांचे लाडके अभिनेते म्हणून ओळखले जातात. मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना ‘अशोक मामा’ म्हणून ओळखते त्यांनी फक्त विनोदी भूमिका नाहीत तर गंभीर भूमिका सुद्धा चोखपणे बजावल्या आहेत. त्यामुळे काही मोजक्या चतुरस्त्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. नुकतंच अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अशोक मामांचा एक किस्सा सांगितला आहे.

किरण माने हे फेसबुकवर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अशोक सराफ यांची एक जुनी आठवण सांगितली आहे. त्यासोबतच किरण माने यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोत किरण माने, त्यांचे वडील आणि अशोक सराफ दिसत आहे.

आदेश भाऊजींनी स्वत: सांगितले ११ लाखांच्या पैठणीचे आणखी एक वैशिष्ट्ये, म्हणाले “ही पैठणी…”

किरण मानेंची फेसबुक पोस्ट

“..एक दिवस दारावरची बेल वाजली आन् “किरन्याSव” अशी हाक आली. वडलांनी दार उघडलं आन् आग्ग्गाय्याय्यायाया.. त्यांचा डोळ्याव इस्वासच बसंना… दारात चक्क अशोक सराफ !

“हे..नाय..आप्लं…हाय, हाय..हाय की किरन…या की..या या” अशी अवस्था झाली दादांची. मामांबरोबर आमची सातारकरीन आनि पाव्हनी श्वेता शिंदे होती. तिनंच घर दावलं मामांना. बारा वर्ष उलटून गेली ह्या गोष्टीला पन फोटू बगीतले की अजूनबी ताजी वाटती.

…खरंतर लै लै लै महान नट अशोकमामा, पन सोत्ताच्या मोठेपनाचं समोरच्यावर कधी दडपन येऊ देत नाय. पांडू हवालदारपास्नं बिनकामाचा नवरा पर्यन्त… गोंधळात गोंधळपास्नं धुमधडाकापर्यन्त… आनि बनवाबनवीपास्नं एक डाव धोबीपछाडपर्यन्त गेली अनेक वर्ष पडद्यावर बगीलेल्या आपल्या आवडत्या नटाला आपल्या घरात, आपल्यासमोर बगून, हरखून गेलेल्या माझ्या घरातल्यांसोबत, मामांनी दोन तास दिलखुलास-मनमोकळ्या गप्पा मारल्या… मनसोक्त पोटपूजाबी केली !

बोलता-बोलता मामा अचानक माझ्या वडलांना-दादांना म्हन्ले, “एकतर मी खोटं बोलत नाही. आणि दूसरं म्हणजे मी प्रत्येकाबद्दल असं बोलत नाही, हे आधी सांगतो.. तुमचा मुलगा किरण हा ब्रिलीयंट ॲक्टर आहे. तो या इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण करेल. बघाच तुम्ही.”

…दादांचे डोळे पान्यानं डबडबले भावांनो.. मामा, तुमी हे सहज बोलून गेलात…पन दादांचा माझ्यावरचा विश्वास आयुष्यभरासाठी घट्ट केलात.. नोकरी-धंदा सोडून अभिनयासारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात जान्याच्या माझ्या निर्णयानं, माझ्यावर कायम नाराज असलेले माझे वडिल, तवापास्नं माझे फॅन झालेत. माझ्या प्रत्येक चढउतारावर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत !

…मामा, आनखी काय बोलू? घरातले जुने अल्बम चाळताना हे फोटो सापडले आनि आठवनी जाग्या झाल्या ! लब्यू लैच”, असे किरण मानेंनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश करताच आसावरी जोशींचा भाजपाला टोला, म्हणाल्या “जीवनावश्यक वस्तू…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांची ही पोस्ट सध्या चांगली व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान किरण माने यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले होते. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. यानंतर किरण माने हे सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.