|| गायत्री हसबनीस
मनोरंजन क्षेत्रातील तारेतारकांसाठी पार्टी हे आनंद साजरा करण्याचे हक्काचे माध्यम. वर्षातील ३६५ दिवस ही मंडळी चित्रीकरणाच्या किंवा सुट्टीच्या निमित्ताने भटकंती करताना दिसतात. पब, जिम, नाइट क्लब, विमानतळ, लग्नसोहळे, वाढदिवस किंवा अगदीच एका महागड्या हॉटेलमध्ये साधं जेवायला गेले तरी ते दिसतात. त्यांची चर्चा होते. आता करोनाच्या काळातही नियम शिथिल झाले म्हणून मंडळी भोजनासाठी एकत्र आली, त्यांनी नाताळ साजरा केला. मग अनेकांना कोविडची लागणही झाली आणि एकच बोंबाबोंब झाली. त्यामुळे यंदा अनेकांनी गुपचूप बाहेर जात नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले आहे… नववर्षाच्या स्वागतासाठी हळूच मायदेशातून बाहेर पडायचे आणि मग आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचल्यावर तिथली छायाचित्रं समाजमाध्यमांवर टाकून वार्ता द्यायची, हा फंडा बॉलीवूडजनांमध्ये चांगलाच रुजला आहे. यंदा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बॉलीवूडमधील काही प्रेमीयुगुल मालदीवला सुट्टीसाठी जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अवघे बॉलीवूड जणू मालदीवमध्ये एकवटले असावे अशी परिस्थिती आहे. त्यात अभिनेता टायगर श्रॉफसोबत दिशा पटानी, सध्या ‘शेरशहा’ या सिनेमामुळे चर्चेत असलेले सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी तसेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे सर्व मालदीव दौऱ्यावर असणार याची कुणकुण सगळीकडे होती. अभिनेता अक्षय कुमारही पत्नी ट्विंकल खन्ना आणि परिवारासह मालदीवला आहे. तिथूनच नवीन वर्षाचे स्वागत त्याने केले. सध्याचे चर्चेतील आणि नुकतेच विवाहबंधनात अडकलेले जोडपे विकी कौशल आणि कटरिना कैफ याआधीच मालदीवला जाऊन मधुचंद्र आटोपून मुंबईत परतले आहेत. त्यामुळे पुन्हा नववर्ष स्वागतासाठी मालदीवला न जाता त्यांनी मुंबईतच त्यांच्या नव्या घरी राहणे पसंत केले आहे. लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा असलेले आलिया आणि रणबीर कपूर यांनी वर्षाचा शेवटचा दिवस एकत्र व्यतीत केला आहे. दोघेही जंगल सफारीसाठी एकत्र गेले होते. आलियाने नवीन वर्षाच्या स्वागताचे हे एकत्रित टिपलेले क्षण समाजमाध्यमावरून आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट केले आहेत. जंगल सफारीसाठी नेमके कुठल्या ठिकाणी ते एकत्र होते याबद्दल त्यांनीही गुप्तता पाळण्याचा प्रयत्न केला. आलियाच्या पोस्टवरून तरी दोघं मस्त हिल स्टेशनला गेले असावेत हे स्पष्ट आहे. दोघेही परदेशी मुक्कामाला जाणार आहेत आणि त्याचे बुकिंग झाले आहे याबद्दलही जाहीर वाच्यता झाली होती. नव्या वर्षात दोघांचेही मोठे सिनेमे प्रदर्शित होणार असल्याने सध्या सर्व प्रेक्षकांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपली कन्या वामिकासह दक्षिण आफ्रिकेला सुट्टीवर आहेत. आफ्रिकेतील ‘आयरिन कन्ट्री लॉज’ येथे हा संपूर्ण परिवार सुट्टी घालवतो आहे. अनुष्कानेही समाजमाध्यमांवर केक कापून नववर्षाचे स्वागत करतानाची छायाचित्रे पोस्ट केली आहेत, तर विराटनेही आपल्या सवंगड्यांबरोबर छायाचित्रे पोस्ट करत नववर्षाचे स्वागत केले. आपल्या मुलीला माध्यमांसमोर न आणण्याचा निश्चय त्यांनी याही वेळी जपला आहे. त्यातल्या त्यात मध्ये मध्ये तिची पाठमोरी छायाचित्रं टाकून आनंद साजरा करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याबद्दल त्यांच्यावर टीकाही केली गेली आहे. मात्र वामिकाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने तरी तिचे मुखदर्शन घडेल अशी त्यांच्या चाहत्यांना आशा आहे. अभिनेत्री सोनम कपूर पती आनंद अहुजासोबत लंडनमध्ये आहे. दोघांनीही लंडनमध्ये नववर्षाचे स्वागत केले, तर बच्चन तसेच कपूर कुटुंबीयांनी घरच्या घरी नवीन वर्षाचे स्वागत केले. शाहीद कपूरसह अभिनेता वरुण धवननेही घरीच नववर्षाचा जल्लोष साजरा केला. करोनाबाधित झाल्याने अभिनेता अर्जुन कपूर विलगीकरणात असल्याने मलायका अरोरा मात्र त्याच्यासमवेत नव्या वर्षाचे स्वागत करू शकली नाही; पण तरीही त्या दोघांनी आपले एकत्र छायाचित्र समाजमाध्यमांवर पोस्ट केले आणि आपल्या चाहत्यांसह एकमेकांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. दोघांनाही एकमेकांची आठवण येते आहे, अशा भावनिक पोस्टही इन्स्टा व्हायरल झाल्या. कधी मी करोनातून बाहेर पडतो आहे आणि आम्ही दोघे पुन्हा एकत्र भेटतो आहे, अशी आपल्या मनातील भावनाही अर्जुन कपूरने कोणताही आडपडदा न ठेवता जाहीर व्यक्त केली.
मराठी तारांकितांमध्ये अभिनेत्री श्रेया बुगडे समुद्रकिनारी निसर्गाचा आस्वाद घेताना दिसली, तर तेजस्विनी पंडित केरळमध्ये सुट्टीवर आहे. मिताली व सिद्धार्थने मुंबईतच नववर्षाचे स्वागत केले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने न्यूलॅन्ड पास येथे पती कुणालसोबत निसर्गाच्या सान्निध्यात नववर्षाचे स्वागत केले. खरं तर करोनाच्या सावटाखाली काढलेली दोन वर्षं मागे टाकून नव्या वर्षात सगळ्यांनीच ताजेतवाने होण्यासाठी निसर्गरम्य प्रदेशाची वाट धरली. काहींनी मात्र बाहेर जायचा मोह आवरत घरीच नववर्षाचे स्वागत केले, मात्र जल्लोष कुठेही कमी नव्हता यात शंका नाही.