parveen babi wanted to quit hindi films to live abroad : बॉलीवूड अभिनेते कबीर बेदी त्यांच्या लव्ह लाईफबरोबरच त्यांच्या उत्तम चित्रपटांमुळेही चर्चेत होते. या अभिनेत्याने त्यांच्या आयुष्यात तीन वेळा लग्न केले. याशिवाय त्यांच्या प्रेमप्रकरणाच्याही चर्चा झाल्या.
एक काळ असा होता, जेव्हा कबीर बेदी आणि अभिनेत्री परवीन बाबी यांचे नाते इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय होते. दोघेही खूप प्रेमात होते. दोघांनीही काही वर्षे एकमेकांना डेट केले. हे नातेही फार काळ टिकले नाही. अभिनेत्रीच्या मानसिक स्थितीमुळे हे नाते तुटले.
अलीकडेच झालेल्या एका संवादात कबीर बेदी यांनी अभिनेत्रीच्या मानसिक आजाराशी असलेल्या संघर्षाबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की, त्यांची पत्नी प्रोतिमा गौरीपासून वेगळे झाल्यानंतर ते आणि परवीन एकत्र आले आणि अभिनेता डॅनी डेन्झोंग्पाबरोबरचे परवीन यांचे नाते संपले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या नात्यात त्यांना तिच्या मानसिक आरोग्याच्या समस्या आढळल्या आणि त्यांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. परवीन यांनी त्यांची मदत नाकारली.
सिद्धार्थ कन्ननशी बोलताना कबीर म्हणाले, “तिला सर्वात मोठी भीती होती की जर लोकांना तिच्या इंडस्ट्रीतील मानसिक अस्थिरतेबद्दल कळले तर ते तिला काम देणार नाहीत. जेव्हा मी लंडनला जाण्यासाठी भारत सोडला तेव्हा परवीनही माझ्याबरोबर होती. लंडनमध्ये माझे एक घर होते आणि मला तिच्याबरोबर माझे आयुष्य पुन्हा सुरू करायचे होते. मला तिला तिथे उपचार मिळावेत अशी इच्छा होती, पण तिला तिच्या आजाराबद्दल कोणत्याही डॉक्टरांना कळू नये अशी तिची इच्छा होती.”
भारतात चित्रपट करण्याव्यतिरिक्त, कबीर बेदी यांचे करिअर परदेशात, विशेषतः युरोपमध्येही भरभराटीचे होते, जिथे संदोकनच्या भूमिकेमुळे ते घराघरात लोकप्रिय झाले. कबीर यांनी खुलासा केला की, परवीन यांनी चित्रपट उद्योग कायमचा सोडण्याचा विचारही केला होता. “तिने चित्रपट उद्योग सोडून माझ्याबरोबर परदेशात राहावे अशी योजना होती. उपचार घेण्यासाठी मी तिच्यावर आणत असलेला दबाव तिला आवडला नाही,” असे त्यांनी सांगितले. कबीर यांनी खुलासा केला की, परवीन त्यावेळी तिचा ‘अमर अकबर अँथनी’ हा चित्रपट प्रचंड हिट झाल्यामुळे भारतात परतली आणि तिला पुन्हा हिंदी चित्रपट उद्योगात काम मिळू लागले.
परवीन यांना परदेशात कबीर बेदीच्या स्टारडमबद्दल असुरक्षित वाटायचे का असे विचारले असता त्यांनी उत्तर दिले, “हे खरे आहे, कारण ती भारतात मोठी स्टार होती आणि मी युरोपमध्ये स्टार होतो. लोक तिला भारतात मिळणारा आदर तिथे देत नव्हते.”
कबीर यांनी इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांच्याशी संबंधित एका किस्सा सांगितला, तिने एकदा त्यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते, ज्यामुळे जीना आणि परवीन यांच्यामध्ये वाद झाला होता. ते म्हणाले, “जीनाने आमचे स्वागत केले आणि तिच्या मैत्रिणींशी आमची ओळख करून दिली, परंतु पार्टीदरम्यान ती फक्त माझ्याशी बोलली आणि परवीनकडे दुर्लक्ष केले, जे परवीनला आवडले नाही. मला वाटले होते की आम्ही एका खासगी जेवणासाठी गेलो की परिस्थिती सुधारेल, परंतु तसे झाले नाही. जीनाने मला डान्ससाठी विचारले आणि आम्ही एकत्र डान्स केले. मी आनंदी होतो की मी जीनासारख्या मोठ्या अभिनेत्रीबरोबर डान्स करत आहे, परंतु त्याच वेळी मला परवीन नाराज असल्याचे जाणवत होते.”
जीनाने परवीन यांचा कसा अपमान केला याबद्दल बोलताना ते म्हणाले, “आम्ही टेबलावर परत आलो तेव्हा जीनाने परवीनशी बोलून म्हटले, “तू इथे काय करत आहेस? तू सेलिब्रेटीला फॉलो करत आहे का?’ तिने परवीनचा अपमान केला आणि मी काही बोलण्यापूर्वीच परवीनने उत्तर दिले, ‘नाही मी माझ्या बॉयफ्रेंडबरोबर आली आहे.’ त्यावेळी जीना सिंगल होती.”
कबीर यांनी सांगितले की या संवादानंतर परवीन यांनी त्यांच्याबरोबर डान्स केला आणि नंतर डिनर पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला. कबीर एका कठीण परिस्थितीत अडकले, कारण ते जीनाने त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या डिनर पार्टीतून बाहेर पडू शकत नव्हते आणि ते परवीन यांना हॉटेलमध्ये एकटे जाऊही देऊ शकत नव्हते, म्हणून अभिनेत्याने पार्टी सोडून परवीनबरोबर हॉटेलमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला. “जीनाने माझ्या गर्लफ्रेंडचा अपमान केला आणि मी ते स्वीकारू शकत नव्हतो,” असे ते म्हणाले.
परवीन बाबी यांचे २००५ मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले. परवीन बाबी यांच्या मृत्यूने कबीर बेदी यांना तीव्र दु:ख झाले. त्यांनी सांगितले की, परबीन बाबी यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी परिस्थितीत झाला. परबीन बाबी यांच्या अंत्यसंस्काराला कबीर बेदी, महेश भट्ट व डॅनी डेन्झोंग्पा उपस्थित होते.