हिंदी आणि मराठी चित्रपट, नाट्य आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील चतुरस्र अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रिमाताईंनी साकारलेल्या कित्येक भूमिकांमधली त्यांची छबी लोकांच्याच काय त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांच्या मनातही कायमची कोरली गेली आहे. त्यांचे आणखी काही चित्रपट आणि मालिका प्रसिद्ध होणार होत्या. मात्र, त्याआधीच त्यांनी निरोप घेतल्याने ही कहाणी अधुरीच राहिली.
रिमाताई स्टार प्लस वाहिनीवरील ‘नामकरण’ मालिकेत काम करत होत्या. मात्र, त्यांच्या अचानक जाण्याने मालिकेच्या संपूर्ण टीमला धक्का बसला आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून ‘नामकरण’च्या निर्मात्यांनी गुरुवारचे चित्रीकरणही रद्द केले होते. पण, शो मस्ट गो ऑन असं म्हटलं जातं. त्यामुळेच निर्मात्यांनी लगेचच रिमाताई साकारत असलेल्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रीची निवड केली आहे. रिमाताई ‘नामकरण’ मालिकेत ‘दयावंती बेन’ची व्यक्तिरेखा साकारत होत्या. त्यांची जागा आता अभिनेत्री रागिणी शाह घेणार असल्याचे कळते. रागिणी शाह याआधी ‘सरस्वतीचंद्र’ आणि ‘दिया और बाती हम’ मालिकांमध्ये झळकल्या आहेत. आता त्यांनी ‘नामकरण’च्या चित्रीकरणालाही सुरुवात केल्याचे कळते.
महेश भट्ट यांच्यासारख्या दिग्दर्शकाच्या लेखणीतून उतरलेल्या ‘नामकरण’ मालिकेत काम करायला मिळाले म्हणून रिमाताई आनंदी होत्या. भट्ट यांच्याबरोबर चित्रपटातून काम करण्याचा अनुभव त्यांना होताच. त्याचसोबत आता त्यांच्या मालिकेतून एक चांगली व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्यानेही त्या उत्साहात होत्या. मात्र मालिका अर्धवट सोडून आणि मराठी चित्रपट येण्याआधीच त्यांचा जीवनप्रवास संपला..