चित्रपटसृष्टीत अशा अनेक नवख्या अभिनेत्री आहेत ज्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि मोठ्या कलाकारांबरोबर काम केले आहे. परंतु यापैकी काही अभिनेत्रींनाच दमदार अभिनयाने आपली छाप सोडता आली. काही अभिनेत्री सुपरस्टार्सबरोबर काम करूनही हिट चित्रपट देऊ शकल्या नाहीत. अशीच एक अभिनेत्री आहे, तिने पाच सुपरस्टार्सबरोबर काम केलं, पण तिचे सगळे चित्रपट फ्लॉप ठरले. तरीही तिच्याकडे मोठ्या बजेटच्या चित्रपटांच्या ऑफर आहेत.
आम्ही आज ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय, ती खूपच तरुण आहे. पण या अभिनेत्रीने एकही हिट चित्रपट दिलेला नाही. २३ वर्षांची ही अभिनेत्री अद्याप अविवाहित आहे, पण ती दोन मुलींची आई आहे.
दोन मुलींना घेतलं दत्तक
या अभिनेत्रीचं नाव आहे श्रीलीला. तिने कन्नड व तेलुगू इंडस्ट्रीत काम केलंय. ‘किस’ नावाच्या कन्नड चित्रपटातून त्याने पदार्पण केलं. श्रीलीलाने २०२२ मध्ये तेलुगू सुपरस्टार रवी तेजाबरोबर ‘धमाका’ नावाचा चित्रपट केला, पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान श्रीलीलाने दोन दिव्यांग अनाथ मुलींना दत्तक घेतलं. तिच्या या कृतीचं प्रचंड कौतुक झालं होतं. २०२३ मध्ये तिने ‘स्कंद’ व ‘भगवंत केसरी’ या चित्रपटांमध्ये काम केलं, पण तेही फ्लॉप ठरले.
२०२४ मध्ये तिने महेश बाबूबरोबर ‘गुंटूर कारम’ मध्ये काम केलं. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. पण तिच्या स्क्रीन प्रेझेन्स आणि लूकचे खूप कौतुक झाले. यामुळेच तिला सतत काम मिळत आहे. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये आलेल्या ‘पुष्पा 2’ ने तिच्या करिअरला कलाटणी मिळाली. तिने यात एक आयटम साँग केलं होतं, हे गाणं खूप गाजलं आणि श्रीलीलाला बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.
यावर्षी मार्च महिन्यात तिचा ‘रॉबिनहुड’ चित्रपट आला होता. पण हा बिग बजेट चित्रपटही फ्लॉप झाला. या चित्रपटात तिच्याबरोबर तेलुगू अभिनेता नितीन होता. दोघांच्या रोमँटिक केमेस्ट्रीची खूप चर्चा झाली, पण तरी प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली.
श्रीलीला लवकरच कार्तिक आर्यनबरोबर एका रोमँटिक चित्रपटात दिसणार आहे. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘आशिकी ३’ ठेवण्यात आले होते, परंतु निर्मात्यांनी त्याचं नाव बदललं आहे. पण नवीन नाव मात्र अद्याप गुलदत्यात आहे.