मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याचा आदिपुरुष हा चित्रपट सध्या चांगला चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. यात अभिनेता प्रभास, सैफ अली खान यांची मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे. हा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हा टीझर पाहून चित्रपटामधील कलाकारांच्या लूकची खिल्ली उडवली. या चित्रपटाच्या व्हीएफएक्सबाबतही नेटकरी टीका करत आहेत. नुकतंच या चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादात विविध संघटनेच्या साधू संतांनी भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटात सनातन धर्माची विटंबना केली आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड बरखास्त करुन ‘सनातन सेन्सॉर बोर्ड’ स्थापन करावा, अशी मागणी अखिल भारतीय संत समितीने दिली आहे.

बॉलीवूड चित्रपटांमध्ये हिंदू देवीदेवतांचे चुकीच्या पद्धतीने चित्रण केले जात असून त्यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे संतांचे म्हणणं आहे. नुकतंच साधू संतांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता. यात विश्व हिंदू परिषद, आखाडा परिषदेसह अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आणखी वाचा : “मी हा चित्रपट…” ‘महाभारता’त कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची ‘आदिपुरुष’च्या टीझरवर प्रतिक्रिया

यावेळी अखिल भारतीय संत समितीचे प्रवक्ते महंत नवलकिशोर दास म्हणाले की, “सेन्सॉर बोर्ड हे डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे. बऱ्याच चित्रपटामध्ये सनातन धर्माची विटंबना केली जाते आणि सेन्सॉर बोर्ड त्याला अगदी सहज मंजूरी देते. आदिपुरुष चित्रपटातही तेच दाखवले आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड बरखास्त करुन ‘सनातन सेन्सॉर बोर्ड’ची स्थापना करावी, अशी आमची सरकारकडे मागणी आहे.”

‘आदिपुरुष’ या चित्रपटाबाबत देशभरात निदर्शने होत आहेत. या चित्रपटातील राम, रावण आणि हनुमान या पात्रांच्या वेशभूषेशी छेडछाड केल्याचाही आरोपही हिंदू संघटनांनी केला आहे. आदिपुरुष या चित्रपटाविरोधात सातत्याने आंदोलने होत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर आणि कलाकारांचे पुतळे जाळले जात आहेत. अनेक हिंदू संघटनांनी हा चित्रपट हिंदूंच्या भावनांविरोधात असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.

आणखी वाचा : विश्लेषण : रणबीर कपूरने बाळासाठी घेतलेल्या पॅटर्निटी लीव्हचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या कायदा आणि तरतुदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘आदिपुरुष’ हा चित्रपट येत्या १२ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट विविध ५ भाषांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. याचे बजेट ५०० कोटी असल्याचे बोललं जात आहे. याचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी यावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी हा चित्रपट बॉयकॉट करा अशी मागणीही केली आहे.