कमाल राशिद खान म्हणजेच केआरके पुन्हा एकदा त्याच्या वाचाळ वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांचा अपमान केल्यानंतर केआरकेने अभिनेता कमल हसन यांच्यावर निशाणा साधला आहे.

कर्नाटकातील प्रख्यात गायक एम बालमुरलीकृष्ण यांच्या निधनानंतर कमाल खानने ट्विटरवरून त्यांच्या बाबत आपले विचार मांडले. त्याने लिहले की, ‘८१ वर्षीय महागुरु डॉ. बालमुरलीकृष्ण यांनी लाखो लोकांना आपल्या संगीताने मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनानंतरही त्यांचा आवाज चिरंतन राहिल. त्यासाठी तंत्रज्ञानाचे आभार. प्रणाम गुरुजी.’ बालमुरलीकृष्ण या दिग्गज गायकाच्या जाण्याचे अजूनही लोक दुः ख व्यक्त करत असताना केआरकेला मात्र त्याच्या ओंगळ टिप्पण्यांनी कमल हसन यांच्यावर निशाणा साधण्याची संधी मिळाली. दिग्गज अभिनेता कमल हसन यांना ‘चाय कम पानी’ असे म्हणत त्यांच्यापेक्षा आपले फोलोअर्स जास्त असल्याचे कमाल खानने म्हटले आहे. त्याने ट्विट केले की, ‘मी नंबर एक समीक्षक आणि सुपर स्टार केआरके याच्या तुलनेत मि. @ikamalhaasan तुमचे केवळ ३ लाख ६७ हजार फोलोअर्स आहेत, म्हणजे तुम्ही चाय कम पानी आहात.’

लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आणि दाक्षिणात्य कलाकारांच्या लूकवर धक्कादायक कमेन्ट करण्याची स्वयंघोषित समीक्षक केआरकेची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी केआरकेने सुपरस्टार रजनीकांत आणि धनुष यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच अभिनेता पवन कल्याणला त्याने जोकर आणि कार्टून असे म्हणत ट्विटची रांगच लावली होती. त्यावरून, तेलगु चित्रपट चाहत्यांनी राग व्यक्त केला होता. त्यानंतर ते ट्विट काढून टाकण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मिडीयावर चर्चेत राहण्यासाठी केआरके सतत आघाडीच्या कलाकारांवर आक्षेपार्ह विधाने करुन त्यांच्या चाहत्यांना डिवचत असतो. दरम्यान, स्वयंघोषित चित्रपट समीक्षक असलेल्या केआरकेने अजय देवगणच्या ‘शिवाय’ चित्रपटातील दृश्य सोशल मिडीयावर लीक केले होते. त्याआधी, करण जोहरने आपल्याला ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी २५ लाख रुपये दिल्याचेही त्याने म्हटले होते. ‘शिवाय’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. तसेच, त्यानंतर त्याने लागोपाठ केलेल्या ट्विट्समधून त्याचा राग मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याच्यावर काढला होता. त्याने आमिरला चक्क बेशरम असे म्हटले होते. आमिरने काही महिन्यांपूर्वी केलेली सनी लिओनीची स्तुती केआरकेला काही रुचली नाही. त्यामुळे, सनी लिओनीची प्रसिद्धी करणा-या आमिरने त्याच्या पत्नीला म्हणजेच किरण रावला घटस्फोट दिला तर मला आश्चर्य वाटणार नाही, अशा आशयाचे ट्विट केआरकेने केलेले.