अभिनेता अजय देवगण याने २०१९ मध्ये त्याच्या वडिलांना गमावलं. अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अॅक्शन स्टंट करणारे कलाकार म्हणून ओळखलं जात होतं. वडिलांच्या आठवणींना उजाळा देत अजय देवगण भावूक झालाय. वीरू देवगण यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने वडिलांच्या आठवणीत त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय.
अजय देवगण याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा थ्रो बॅक फोटो शेअर केलाय. या ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोमध्ये अजय आपले वडील वीरू देवगण यांच्या खांद्यावर हात ठेवून पोज देताना दिसून येतोय. हा फोटो शेअर करताना त्याने एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्याने लिहिलं, “प्रत्येक दिवशी तुमची आठवण येते…आजच्या दिवशी तर खूपच…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पापा…आयुष्य पहिल्यासारखं नाही राहिलं.”
View this post on Instagram
याआधी २७ मे २०२० रोजी अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचा पहिला स्मृतीदिन होता. त्या निमित्ताने अजयने वडिलांच्या आठवणीत एक व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी भावूक होत त्याने एक पोस्ट देखील लिहिली होती. “माझे लाडके डॅड, तुम्ही आमच्यापासून दूर जाऊन एक वर्ष झालं…पण तरीही तुम्ही माझ्या आजुबाजुलाच आहात, असं वाटत असतं. शांत स्वभाव, काळजी घेणारे, कायम तुम्ही आमच्या सोबत राहत होतात.”, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
View this post on Instagram
अभिनेता अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचे अनेक चित्रपट हे रिलीजच्या प्रतिक्षेत आहेत. लवकरच त्याचा ‘मैदान’ हा चित्रपट भेटीला येणारेय. हा चित्रपट फुटबॉल कोच सैय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘भूज: द प्राईड ऑफ इंडिया’, ‘आरआरआर’, ‘मेडे’, ‘थॅंक गॉड’ असे अनेक चित्रपट रिलीजच्या प्रतिक्षेत आहेत. त्याशिवाय अक्षय कुमार स्टारर ‘सुर्यवंशी’ चित्रपटात त्याचा कॅमिओ देखील असणार आहे. त्याचप्रमाणे तो ‘रूद्र- द एड्ज ऑफ डार्कनेस’ मधून वेब सीरिजच्या विश्वात डेब्यू करणार आहे.