बुधवारी संध्याकाळी मुंबईत ‘कराटे किड लेजेंड्स’ या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरच्या लाँचशी संबंधित एक कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये अजय देवगणने त्याचा मुलगा युगबरोबर एन्ट्री केली. लाँच इव्हेंटमध्ये काही मुले कराटे ड्रेस परिधान केलेले दिसले आणि कराटे अॅक्शन्सदेखील करताना दिसले.
वयाच्या १४ व्या वर्षी अजय देवगणचा मुलगा युगने मनोरंजन जगात प्रवेश केला आहे; पण अद्याप तो पडद्यावर आलेला नाही. युग ‘कराटे किड : लेजेंड्स’ नावाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटाला आपला आवाज देणार आहे.
या चित्रपटात अजय देवगणने जॅकी चॅनचा आवाज दिला आहे; तर युगने ली फोंग (बेन वांग)च्या आवाजात पदार्पण केले आहे. त्यामुळे नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, जिथे अजय देवगण त्याचा मुलगा युगसह चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. तिथे बाप-लेकाच्या जोडीने चाहत्यांची मने जिंकली. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी युगने त्याच्या वडिलांबरोबर पत्रकार परिषदेला हजेरी लावली. अजयच्या ‘सिंघम’ या हिट चित्रपटाबद्दल लहान मुलाचे खास मत ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
अजय देवगण दिसला मुलगा युगबरोबर
अजय देवगण आणि त्याचा मुलगा युग यांनी नुकतेच ‘कराटे किड : लेजेंड्स’ या आगामी हॉलीवूड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पत्रकार परिषदेला हजेरी लावली. त्याने त्याच्या हिंदी आवृत्तीसाठी आवाज दिला आहे आणि चाहते अजय व काजोलच्या मुलाबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक आहेत. कार्यक्रमादरम्यान युगला ‘सिंघम’मधील एक डायलॉग ऐकवण्याची विनंती करण्यात आली, जो त्याच्या वडिलांचा प्रसिद्ध डायलॉग होता. युगने उत्तम उत्तर दिले. म्हणाला, “मित्रा, एका दिवसात सिंघम बनवशील का?”
अजय देवगणच्या उत्तराने जिंकले मन
युगच्या या डायलॉगने सर्वांना हसायला आले आणि कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने अजयला विचारले की, युग आधीच ‘सिंघम’ झाला आहे की तो होण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यावर अजयने दिलेल्या उत्तराने सर्वांची मने जिंकली आणि म्हणाला की, कोणीही कोणालाही ‘सिंघम’ बनवू शकत नाही. त्यासाठी अशी खास संधी फक्त देवच देऊ शकतो.
त्याच कार्यक्रमात अजय देवगणने सांगितले की, ‘कराटे किड : लेजेंड्स’मध्ये काम करणारा त्याचा मुलगा युग देवगण याचा त्याला अभिमान आहे. जोनाथन एंटविस्टल दिग्दर्शित ‘कराटे किड : लेजेंड्स’ हा २०२५ मध्ये प्रदर्शित होणारा एक अमेरिकन मार्शल आर्ट्स चित्रपट आहे. १९८४ मध्ये सुरू झालेल्या कराटे किड फ्रँचायजीमधील हा सहावा चित्रपट आहे. त्यात जॅकी चॅन, बेन वांग, राल्फ मॅचियो, जोशुआ जॅक्सन, सॅडी स्टॅनली आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकांत आहेत. हा चित्रपट ३० मे रोजी अमेरिका, भारत व कॅनडामध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतात हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमीळ व तेलुगू या भाषांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध असेल.