दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सूर्यवंशी चित्रपटाने जगभरात २०० कोटींहून अधिकचा गल्ला कमावला. ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या यशानंतर आता रोहित शेट्टीने आगामी ‘सिंघम 3’ चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. नुकतंच त्याने याबाबतचा खुलासा केला आहे.

बॉलिवूड लाईफ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सूर्यवंशी चित्रपटानंतर रोहित शेट्टीने सिंघम 3 या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. अजय देवगणच्या सिंघम 3 मध्ये अक्षय कुमार आणि रणवीर सिंग हे दोघे झळकणार का? असा प्रश्न रोहित शेट्टीला विचारला. त्यावेळी तो म्हणाला, “याबाबत आता काहीही बोलणे फार घाईचे होईल. चित्रपटात त्या दोघांच्या एंट्रीबद्दल मी अजून काहीही ठरवलेले नाही. हा चित्रपट बनून दोन वर्षे झाली आहेत, मात्र तोपर्यंत अनेक गोष्टी बदलू शकतात,” असे रोहित शेट्टीने सांगितले.

रोहित शेट्टी पुढे म्हणाला की, “अक्षय कुमारने साकारलेल्या ‘वीर सूर्यवंशी’ आणि रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’ या पात्राचे प्रचंड कौतुक केले जात आहे. पण सिंघम 3 या चित्रपटात हे तिघे जण असतील की नाही याबाबत मी कोणतीही योजना केलेली नाही,” असेही त्याने म्हटले.

“या चित्रपटातील कथा कशी सुरु होणार आहे, कशी संपणार आहे, याबाबत मला काहीही माहिती नाही. हे कथानक लिहिणे कठीण आहे. जर तुम्ही सिम्बा बघितला असेल तर अक्षय कुमारची एंट्री ठराविक वेळी झाली होती. त्यानंतर जर तुम्ही सूर्यवंशी पाहिला तर आम्ही ती कथा एका अशा वळणावर सोडली आहे जिथून सिंघम त्याला पुढे नेईल. त्यामुळे जोपर्यंत आम्ही त्या कथेचा ते शेवट लिहित नाही तोपर्यंत आपण तिथे पोहोचू शकत नाही,” असे रोहितने सांगितले.

हेही वाचा : खुशखबर! ‘सूर्यवंशी’ आता होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित, या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंह, कतरिना कैफ आणि अजय देवगण अशी तगडी स्टार कास्ट आहे. तसेच अभिनेते गुलशन ग्रोव्हर खलनायकाच्या भूमिकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत आहे. मात्र करोनामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. अखेर ५ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.