Akshay Kumar On Baaghi 4 : टायगर श्रॉफ आणि संजय दत्त यांचा ‘बागी ४’ हा चित्रपट आज (५ सप्टेंबर) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लोकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूपच वाढली होती आणि ते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, अभिनेता अक्षय कुमारने टायगर श्रॉफला ‘बागी ४’ साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘बागी ४’शी संबंधित एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये अक्षयने टायगर श्रॉफ आणि चित्रपटाच्या इतर टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयने त्याच्या स्टोरीमध्ये टायगर श्रॉफ आणि सुनील मोरारजी यांचा फोटो शेअर केला आहे.

अक्षयने लिहिले आहे की, ‘बागी ४’चा आवाज ऐकू येत आहे. फुल ऑन ॲक्शन हंगामा. माझे मित्र साजिद नाडियाडवाला, टायगर श्रॉफ आणि सुनील मोरारजी यांचे हार्दिक अभिनंदन. संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.” काही दिवसांपूर्वी ‘बागी ४’चा ट्रेलर समोर आला होता. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सूड, मारामारी आणि धमाकेदार ॲक्शन असल्याचं पाहायला मिळालं होतं.

‘बडे मियाँ छोटे मियाँ २’मध्ये अक्षय-टायगर दिसले होते एकत्र

अक्षय कुमारने टायगर श्रॉफबरोबर ‘बडे मियाँ छोटे मियाँ २’ या चित्रपटात काम केले आहे. हा एक अ‍ॅक्शन चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. परंतु, अलीकडेच टायगर श्रॉफने एका मुलाखतीत सांगितले की त्याला या चित्रपटात काम करायला आवडले आणि अक्षयसह अनेक लोक चित्रपटाच्या सेटवर त्याचे मित्र बनले.

‘बागी ४’ हा टायगर श्रॉफच्या ‘बागी’ फ्रँचायझीचा चौथा चित्रपट आहे. या चित्रपटात टायगरबरोबर संजय दत्त, हरनाज कौर संधू, सोनम बाजवा, श्रेयस तळपदे आणि सौरभ सचदेवा हे प्रमुख भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन आणि हिंसाचार आहे, ज्यामुळे ‘बागी ४’ ला सेन्सॉर बोर्डाने ‘ए’ प्रमाणपत्र दिले आहे. हा चित्रपट ए हर्ष यांनी दिग्दर्शित केला आहे.