‘अतरंगी रे’ आणि ‘रक्षाबंधन’ पाठोपाठ आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘गोरखा’ असून चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र या पोस्टरमध्ये माजी लष्कर अधिकारी मेजर माणिक एम जोली यांनी एक चूक सांगितली आहे. “ही चूक गंभीर असून याप्रकरणी लक्ष द्यावे,” असा सल्लाही त्यांनी अक्षयला दिला आहे. विशेष म्हणजे अक्षयनेही यावर प्रतिक्रिया देत “यापुढे मी काळजी घेईन,” असे सांगितले आहे.

अक्षय कुमारने नुकतंच सोशल मीडियावर गोरखा चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने, ‘कधी कधी तुमच्या समोर अशा कथा येतात ज्या तुम्हाला प्रेरणादायी वाटतात. त्यावर काम करण्याची तुमची इच्छा होते, असे लिहिले आहे. अक्षयच्या आगामी चित्रपटातील हे पोस्टर गोरखा रायफल रेजिमेंटचे अधिकारी मेजर माणिक एम जोली यांनी त्यांच्या ट्वीटरवर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करतेवेळी त्यांनी एक गंभीर चूक सर्वांच्या नजरेस आणून दिली.

मेजर माणिक एम जोली म्हणाले, “प्रिय अक्षय कुमार, मी एक माजी गोरखा अधिकारी आहे. त्यामुळे तुम्ही या चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. पण तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील खुकरी ही व्यवस्थित दाखवावी. खुकरी हे एक धारदार शस्त्र असून त्याची धार ही आतील बाजूला असते. ही तलवार नाही तर खुकरी आहे, जिचा वार आतील बाजूने होतो. यासाठी मी तुम्हाला खुकरीचा एक फोटोही पाठवत आहे. धन्यवाद,” असे ट्वीट त्यांनी केले.

मेजर माणिक एम जोली यांनी ही चूक दाखवल्यानंतर अक्षय कुमारने तातडीने त्यांना प्रतिक्रिया दिली. “आदरणीय, मेजर जोली जी, तुम्ही ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. या चित्रपटाचे चित्रिकरण करतेवेळी आम्ही याची अत्यंत काळजी घेऊ. ‘गोरखा’ हा चित्रपट बनवताना मला खूप अभिमान वाटत आहे. या चित्रपटातून खरे वास्तव लोकांच्या समोर आणण्यासाठी कोणत्याही सूचनांचे स्वागत केले जाईल,” अशी प्रतिक्रिया अक्षयने दिली.

‘गोरखा’ हा चित्रपट भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटच्या पाचव्या गोरखा रायफल्सचे अनुभवी अधिकारी मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्या जीवनावर आधारित आहे.. कार्डोजो यांनी १९६२, १९६५ साली झालेले युद्ध आणि १९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धात कामगिरी बजावली होती.