मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्यामुळे ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे दिग्दर्शक जगन शक्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून या उपचारांचा खर्च अभिनेता अक्षय कुमार करत आहे. एका पार्टीमध्ये जगन शक्ती यांना अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना २५ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अक्षय कुमार कायमच अडीअडचणीत सापडलेल्यांच्या मदतीला पुढे सरसावतं असतो. यावेळीदेखील त्याने त्याच्या मदतीचा हात पुढे केला आहे. तसंच मिशन मंगलचे दिग्दर्शक आणि अक्षय यांच्यात चांगलं मैत्रीपूर्ण नातं आहे. त्यामुळे सध्या जगन शक्ती यांच्या उपचारांचा खर्च अक्षय स्वत: करत आहे.

अक्षयला जगन शक्ती यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळताच त्याने त्याच्या टीमला दिग्दर्शकांचा संपूर्ण खर्च उचलण्यास सांगितलं. तसंच त्यांच्या घरातल्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजीही घेण्यास सांगितलं.

वाचा : सिताफळ खाल्ल्यामुळे स्त्रियांना होऊ शकतो ‘हा’ फायदा

जगन शक्ती यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यामुळे चिंता करण्याची काळजी नाही, असं चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की यांनी सांगितलं. जगन शक्ती यांचा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, शर्मन जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.