Alia Bhatt and Ranbir Kapoor New Home : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचा पती रणबीर कपूर दिवाळीत त्यांच्या नवीन घरात राहायला जाणार आहेत. मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या या बंगल्याचे बांधकाम गेल्या काही काळापासून सुरू आहे. आलिया आणि रणबीर कपूर यांच्या आयुष्यात ही एक नवी सुरुवात असेल. हे घर बॉलीवूड सेलिब्रिटींच्या सर्वांत महागड्या घरांपैकी एक असेल.

या जोडप्याने स्वतः त्यांच्या चाहत्यांना गृहप्रवेश समारंभाबद्दल अधिकृतपणे माहिती दिली; परंतु यावेळी गोपनीयतेची विनंतीदेखील केली. एक निवेदन प्रसिद्ध करताना या जोडप्याने लिहिले, “दिवाळी म्हणजे कृतज्ञता आणि नवीन सुरुवात. आम्ही आमच्या नवीन घरात प्रवेश करत असताना, तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत.” आलिया आणि रणबीर कपूरचे हे घर अनेक प्रकारे खास असेल.

मुंबईतील सर्वांत आलिशान परिसरात असलेला हा सहा मजली बंगला कपूर कुटुंबाच्या पूर्वीच्या घराच्या, कृष्णा राज बंगल्याच्या जागेवर बांधला आहे. या आलिशान घरात टेरेस गार्डन्सपासून ते आलिशान इंटेरियर आणि आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत सर्व काही आहे.

सेलिब्रिटींच्या सर्वांत महागड्या घरांपैकी एक असलेल्या या बंगल्याची किंमत २५० कोटी आहे. रणबीर आणि आलियाव्यतिरिक्त त्यांची मुलगी राहा आणि आई नीतू कपूरही येथे राहतील.

रणबीर-आलियाचे घर खास का?

घरातील एक खास खोली रणबीर कपूरचे दिवंगत वडील ऋषी कपूर यांना समर्पित करण्यात आली आहे. तेथे ऋषी कपूर यांची पुस्तके, त्यांची आवडती खुर्ची, वॉर्डरोब अशा त्यांची आठवण करून देणाऱ्या वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. ही मालमत्ता राहाच्या नावावर नोंदणीकृत आहे. घराला विंटेज लूक देण्यासाठी राखाडी आणि ऑफ-व्हाइट टोन वापरण्यात आला आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलब्रिटी जोडपे आहे. अनेकदा ते त्यांच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. त्यांची मुलगी राहा ही चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. रणबीर-आलियाने ब्रह्मास्त्र या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले.