ऋषभ शेट्टी सध्या त्याच्या ‘कांतारा चॅप्टर १’ या चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. ऋषभचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कमाईच्या बाबतीत, हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.

आता ऋषभ शेट्टी आणि चालुवे गौडा अमिताभ बच्चन यांनी आयोजित केलेल्या प्रसिद्ध क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती १७’च्या मंचावर पोहोचले. त्यादरम्यान, केवळ ऋषभ शेट्टीच नाही, तर अमिताभ बच्चन यांनीही वैयक्तिक गोष्टी शेअर केल्या. बिग बींनी सांगितले की, त्यांची मुलगी श्वेता बच्चन ‘कांतारा’ पाहिल्यानंतर खूप अस्वस्थ झाली होती.

अमिताभ बच्चन यांच्याशी बोलताना ऋषभने सांगितले की, तो त्याच्या शाळेच्या काळात हुशार नव्हता. त्याने सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबरच्या एका संस्मरणीय भेटीची आठवणही सांगितली, ज्याची त्याच्यावर खोलवर छाप पडली. ऋषभ म्हणाला, “चित्रपटानंतर ते मला भेटू इच्छित होते; पण मला माहीत नव्हते कधी भेटायचे. प्रॉडक्शन हाऊसने मला अचानक सांगितले आणि मला वेष्टी (तमिळनाडूमध्ये घातले जाणारे धोतर) घालण्याची संधीही मिळाली नाही. जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा मला अजूनही पश्चात्ताप आहे की त्यांनी ‘वेष्टी’ घातली होती आणि मी जीन्स घातली होती.”

ऋषभने अमिताभ बच्चन यांच्या घरी गेल्याचा अनुभव आठवला, तो म्हणाला, “मी जयाजींचे आणि तुमचे सर्व पुरस्कार तिथे ठेवलेले पाहिले.” अमिताभ म्हणाले, “हे सर्व माझे नाहीत. घरात आणखी तीन-चार लोक आहेत, ज्यांचे पुरस्कार तिथे ठेवलेले आहेत.”

अमिताभ बच्चन काय म्हणाले?

अमिताभ बच्चन म्हणाले, “सर्वप्रथम तुमचे चित्रपट अजून पाहिले नाहीत याबद्दल मी माफी मागतो… पण माझी मुलगी श्वेता, ‘कांतारा’ बघायला गेली होती आणि तिला काही दिवस झोप येत नव्हती. ती तुमच्या अभिनयाने, विशेषतः शेवटच्या दृश्याने खूप प्रभावित झाली.”

अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटले असले तरी चित्रपटाचा बोलबाला कायम आहे.