अनुष्का शर्माबरोबर सध्या विराट कोहली वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवर दिसत आहे. दोघांनीही रविवारी अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते हनुमान गढी येथे गेले आणि बजरंग बलीचे दर्शन घेतले. हनुमान गढी मंदिरात विराट-अनुष्काच्या पूजेचा व्हिडीओही समोर आला आहे. जेव्हा ते हनुमान गढी मंदिरात पोहोचले तेव्हा पुजाऱ्याने त्यांना फुलांचा हार घातला. त्यादरम्यान चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होते.

त्या प्रसंगी विराटने ऑफ-व्हाइट कुर्ता घातला होता; तर अनुष्का शर्माने लव्हेंडर सूट घातला होता आणि दोघेही त्यांच्या मुलांशिवाय तेथे गेल्याचे दिसत होते. १२ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट पत्नी अनुष्कासह वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घ्यायला पोहोचला होता. दोघांनीही प्रेमानंद महाराजांशी आध्यात्मिक चर्चा केली.

हनुमान गढी मंदिरात पूजा

हनुमान गढी मंदिरातील त्यांच्या पूजेचा व्हिडीओही समोर आला आहे. हनुमान गढी मंदिराच्या पुजाऱ्याने त्यांना फुलांचा हार घातला. विराट आणि अनुष्काचा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी या जोडप्याचे कौतुक केले.

रविवारी दोघांनी हनुमान गढी मंदिराला भेट दिल्यानंतर त्याबद्दल माहिती देताना, हनुमान गढी मंदिराचे महंत संजय दास जी महाराज यांनी एएनआयला सांगितले की, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना अध्यात्माची खूप ओढ आहे. भगवान रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी हनुमान गढी येथे आशीर्वादही घेतला. त्यांच्याबरोबर अध्यात्मावर काही चर्चाही झाल्या.

अनुष्का शर्मा आपल्या स्टार क्रिकेटर पती विराट कोहलीला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच मैदानावर हजर असते. शुक्रवारी (२३ मे) ती लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर दिसली होती. अनुष्का शर्मा लवकरच ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे, जो क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती सहा वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करीत आहे. ती शेवटची ‘झिरो’ या चित्रपटात शाहरुख खान आणि कतरिना कैफ यांच्याबरोबर दिसली होती. ‘चकदा एक्स्प्रेस’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे; परंतु त्याच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.