रेश्मा राईकवार
मराठी-हिंदी चित्रपट, मालिका, रंगभूमी सगळीकडे वावर असलेला आणि तरीही त्याचा नवा कुठला चित्रपट आला आहे म्हटल्यावर त्याबद्दल उत्सुकता वाटावी, त्याचं काम पाहण्याची इच्छा व्हावी असा कलाकार म्हणजे अभिनेता सुमीत राघवन. ‘एकदा काय झालं’ हा त्याचा नवाकोरा चित्रपट सध्या चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या चोखंदळ भूमिका, डॉ. सलील कुलकर्णीपासून ते मृणाल कुलकर्णी-सुबोध भावेसारख्या समविचारी कलाकारांबरोबर काम करतानाचा अनुभव ते ‘कारशेड वही बनेगा’ ही भूमिका अशा विविध मुद्दय़ांवर सुमीतने मनमोकळय़ा गप्पा मारल्या.
‘एकदा काय झालं’ हा प्रसिद्ध संगीतकार-दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा चित्रपट. या चित्रपटातील भूमिकेशी सुमीतचं सूत कसं जुळलं? याबद्दल बोलताना ते सलीलबरोबर असलेल्या त्याच्या मैत्रीमुळे शक्य झाल्याचं त्याने सांगितलं. ‘‘सलील हा माझा खूप जुना मित्र. २००७ साली सारेगमपचं जे सेलिब्रिटी पर्व झालं तेव्हा त्याच्याशी पहिल्यांदा मैत्री झाली. सलील हा किती उत्तम संगीतकार आहे हे मी सांगण्याची गरज नाही. किंबहुना जिथे जिथे मराठी मन आणि हृदय आहे तिथे तिथे सलील आणि संदीप खरेची जोडगोळी पोहोचली आहे. इतका प्रतिभावान आणि तितकाच हळवा सलील दिग्दर्शनाकडे वळला तेव्हा मला आश्चर्य वाटलं नाही. कारण कलाकार म्हणून ते त्याचं पुढचं पाऊल होतं. तो जसं गाण्यातून त्याची गोष्ट सांगत आला होता, तसाच तो आता दिग्दर्शक म्हणून आपली गोष्ट सांगणार. त्याहीपेक्षा सलील चित्रपट करणार म्हणजे काही तरी साधंच, पण हळवं करणारं असं काही असणार याची मला खात्री होती. हे दोन्ही शब्द सध्याच्या काळात हरवले आहेत. काही तरी भारी करण्याच्या नादात लोक खूप काही तरी क्लिष्ट करत राहतात. त्यामुळे सलीलचा चित्रपट आहे हे ऐकल्यावरच मी होकार दिला होता,’’ असं सुमीतने सांगितलं.
बाप-लेकाच्या नात्याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट एखादा एकजिनसी पदार्थ असावा तितका उत्कृष्ट जमून आला आहे, असं सुमीतने सांगितलं. त्याचं कारण म्हणजे या चित्रपटाची कथा- संवाद, संगीत, दिग्दर्शन सगळंच सलील कुलकर्णी यांनी केलं आहे. ‘‘एकच माणूस जेव्हा या सगळय़ा गोष्टी करतो तेव्हा त्यात एक सुसूत्रता असते,’’ असं सुमीत म्हणतो. खरं तर, कोविडच्या आधी केलेला हा चित्रपट जवळपास अडीच-तीन वर्षांच्या अंतराने प्रदर्शित झाला आहे; पण चित्रपट उशिरा प्रदर्शित झाला असला तरी त्याचा विषय कधीच जून होणार नाही, याची आम्हाला खात्री होती, असं त्याने सांगितलं. मुळात बाप आणि मुलाची भावना ही कधीच कोमेजून जाणारी नाही. आई किंवा वडिलांचं हृदय जे मुलासाठी धडधडतं ते कायम तसंच धडधडत राहणार आणि ही त्या नात्याची गोष्ट आहे. शिवाय, आत्ताच्या काळात जेव्हा खरंच नाती विसविशीत होत आहेत, म्हणजे अगदी आजी-आजोबांनाही तुम्ही मध्ये पडू नका यात.. असं सांगून मुलं मोकळी होतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्या प्रत्येक नात्यावर भाष्य करणारा, आपली असलेली नाती दृढ करायला लावणारा असा हा चित्रपट असल्याचे सुमीतने सांगितले.
‘‘कमी काम करावं, पण लोकांच्या लक्षात राहील असं करावं या मताचा मी आहे. चित्रपटाचं यश-अपयश आपल्या हातात नसतं, पण किमान कुठल्या प्रकारचा चित्रपट निवडावा हे आपल्या हातात असतं आणि मी खरंच अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच चित्रपट केले आहेत’, असं सुमीत सांगतो. ‘संदूक’, ‘बकेट लिस्ट’, नाना पाटेकरांबरोबरचा ‘आपला माणूस’ असेल किंवा सुमित्रा भावेंबरोबर केलेला ‘वेलकम होम’.. या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका वेगळय़ा होत्या. ‘कलाकार म्हणून मी दररोज प्रेक्षकांना दिसलं पाहिजे, असा माझा अट्टहास नाही. दूरचित्रवाहिनीवरच्या भूमिका हा वेगळा विषय आहे, मात्र तिथेही मालिकांच्या निवडीबाबत मी चोखंदळ राहिलो आहे. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ किंवा आत्ताची ‘वागले की दुनिया’ या मालिका वेगळय़ा धाटणीच्या आहेत. रंगभूमीवरही ‘हॅम्लेट’, ‘नॉक नॉक’ असे वेगळे प्रयोग मी केले आहेत. कलाकाराचं हे शरीर एखाद्या वाद्यासारखं आहे. तो ढोल असतो ना तो रोज बडवायचा की त्याला मध्ये मध्ये तेलपाणी करून त्याची मशागत करायची आणि वाजवायचा हे तुम्ही ठरवायला हवं. शेवटी प्रेक्षकांना त्या कलाकाराबद्दल वाटत असलेली उत्सुकताही कायम राहिली पाहिजे,’’ हा त्याच्या निवडीमागचा विचारही तो स्पष्टपणे सांगतो.
शैलीदार अभिनय मागे पडला आहे..
सुमीतने याआधी रत्ना पाठक शाह, सतीश शाह यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे. या कलाकारांबरोबर काम करताना खूप काही शिकायला मिळालं. इतकी र्वष अभिनय क्षेत्रातला त्यांचा अनुभव आणि जगभरातला सिनेमा त्यांनी पाहिलेला असल्याने त्यांची त्याबद्दलची जाण तुम्हाला खूप काही शिकवून जाते. शिवाय, अशा पद्धतीने समविचारी कलाकार जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा त्यांच्यात एक छान देवाणघेवाण होत असते. ती पडद्यावरही खुलून दिसते, असं तो म्हणतो. ‘समविचारी’ म्हणजे आम्ही सगळेच सहज अभिनयावर भर देणारे कलाकार आहोत, हे स्पष्ट करतानाच राजेश खन्ना – देव आनंद यांच्यासारख्या कलाकारांनी शैलीदार अभिनयाची पद्धत लोकप्रिय केली होती. मात्र आता तसा अभिनय लोकांना आवडत नाही. अभिनयाची ती शैली कधीच मागे पडली आहे, असं निरीक्षण त्याने नोंदवलं. ओटीटीमुळे जगभरातील विविध प्रांतांतील चित्रपट आपण पाहतो. तिथेही कायम सहज, नैसर्गिक अभिनयावर भर दिला जातो. त्यामुळे वास्तवात लोक कसं बोलतात, कसं वागतात, याचं निरीक्षण नटाने केलं पाहिजे. ते आपल्या आत झिरपत ठेवलं पाहिजे. त्यातूनच तुम्ही सहजपणे आपल्या भूमिका रंगवत जाता, असं सुमीतने सांगितलं. अभिनयाच्या क्षेत्रात एक मापदंड निर्माण केल्यानंतर दिग्दर्शनाकडे वळण्याचाही सुमीतचा प्रयत्न आहे. २०१९ मध्येच त्याने आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणासाठी चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली होती, मात्र त्याचं पुढे काहीच होऊ शकलं नाही; पण लवकरच आपण दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार असल्याची ग्वाही सुमीतने दिली.
एक सजग नागरिक म्हणून मी बोलणारच..
‘आरेमध्येच कारशेड झाली पाहिजे’, हीच भूमिका मी पहिल्यापासून मांडली आहे आणि आजही त्यावर कायम आहे, असं त्याने सांगितलं. यामागचा आपला विचार मांडताना तो म्हणतो, ‘‘मुंबईच्या लोकल विस्ताराला आता मर्यादा आली आहे. सागरी मार्ग वा अन्य मार्गाचे पर्याय जे उभे केले जातात त्यातही प्राधान्याने चारचाकी गाडय़ांचा विचार झालेला आहे. शिवाय, सागरी मार्ग करण्यासाठीही तुम्ही समुद्रात भराव टाकणार, परिणामी पर्यावरणाचा धोका तिथेही आहेच. एरव्ही अनेक कारणांसाठी झाडांची कत्तल केली जाते, मात्र त्या वेळी कोणीही पुढे येत नाही.’’ गेली अडीच र्वष जागेच्या या वादामुळे मेट्रो प्रकल्पाला खीळ बसली आहे, याकडे तो लक्ष वेधतो. कल्याण आणि त्याच्यापुढे वा विरार किंवा त्यापलीकडच्या उपनगरांमधून रोजच्या रोज जे लोक मुंबईत कामासाठी येतात त्यांना दळणवळणासाठी मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीची साधनं उपलब्ध करून देणं हे सध्या खूप गरजेचं आहे आणि अशा वेळी झाडांची कत्तल होते अशी ओरड करत या सोयीसुविधांची निर्मितीच पुन्हा थांबवली जाते हे योग्य नाही, असं मत त्याने व्यक्त केलं. कलाकार म्हणून अशी स्पष्ट भूमिका घेतलीस तर तुझ्या कारकीर्दीवर परिणाम होईल, असे सल्लेही मिळाले; पण मी त्याचा विचार करत नाही. इतकी र्वष झाली तरी एक नागरिक म्हणून मला चांगले रस्ते, वाहतुकीची साधनं अशा मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. खड्डे, ट्रॅफिक या समस्यांनी मला त्रास होतो. त्यामुळे एक सजग नागरिक म्हणून मी या समस्यांबद्दल बोलणारच.. असंही तो ठामपणे सांगतो.
समविचारी कलाकारांबरोबर काम करण्यात वेगळाच आनंद
सलीलबरोबर चित्रपट केल्यानंतर आता मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित, अभिनीत त्याची आणि सुबोध भावेची भूमिका असलेला ‘सहेला रे’ हा चित्रपट लवकरच प्लॅनेट मराठी या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. आम्ही सगळे समविचारी कलाकार आहोत, मित्र आहोत. दर वेळी आम्ही चित्रपटांच्या सेटवर कलाकार म्हणून भेटतो तेव्हा आम्ही आमच्या भूमिकांमध्ये असतो. आमच्यात होणारी देवाणघेवाण ही कलाकार म्हणून असते. मात्र तेच जेव्हा सलीलसारखा संगीतकार मित्र दिग्दर्शन करतो किंवा मृणाल दिग्दर्शन करते तेव्हा हीच देवाणघेवाण वेगळा अनुभव देणारी असते. एकंदरीतच समविचारी कलाकारांबरोबर काम करताना खूप आनंद होतो, असंही सुमीतने सांगितलं.