अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. पण, या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाण्यावरून नव्या वाद रंगला आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने घाललेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून भाजपा आणि हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. काही ठिकाणी याविरोधात आंदोलनही करण्यात आलं आहे.

यावर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्षेप घेत चूका सुधाराव्यात, अशी मागणी केली आहे. “‘पठाण’ हा चित्रपट दोषपूर्ण असून विषारी मानसिकतेवर आधारीत बनला आहे. ‘बेशरम रंग’ गाण्याचे बोल आणि गाण्यात घातलेले भगवे आणि हिरवे कपडे यात निर्मात्यांनी बदल करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा मध्यप्रदेशात चित्रपटाचे प्रदर्शन होऊ द्यायचे की नाही याचा निर्णय आम्ही घेऊ,” असा इशारा गृहमंत्री मिश्रा यांनी म्हटलं.

हेही वाचा : “शाहरुखचा ‘पठाण’ ज्या चित्रपटगृहात लागेल ते जाळून टाका”, अयोध्येतील महंतांची आक्रमक भूमिका

‘बेशरम रंग’ गाण्यावरून सुरु असलेल्या वादावर आता गायिका कॅरालिसा मोंटेरो यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कॅरालिसा मोंटेरो यांनी ‘बेशरम रंग’ गाण्यात स्पॅनिश बोल गायले आहेत. कॅरालिसा मोंटेरो म्हणाल्या, “शाळा शिकत असल्यापासून राष्ट्रध्वजातील भगव्या रंगाचा एकमात्र संबंध मला आठवतो, तो म्हणजे धैर्य आणि निस्वार्थीपणासाठी. मला माहिती नाही कोणत्या खासदाराने ( मध्यप्रदेशचे गृहमंत्री ) यावर आक्षेप घेतला आहे. पण, आपल्या देशात काल्पनिक चित्रपटात वापरण्यात आलेल्या कपड्यांच्या रंगापेक्षा जास्त गंभीर समस्या आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे,” असं मत कॅरालिसा मोंटेरो यांनी व्यक्त केलं. त्या ‘इंडिया टुडे’शी बोलत होत्या.

हेही वाचा : “जग काहीही बोललं तरीही मी…”; Boycott Pathan ट्रेंडदरम्यान शाहरुख खानचं विधान

दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट ‘बॉयकॉट’ करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. अशाच अभिनेता शाहरुख खानने सोशल मीडियाबद्दल एक विधान केलं आहे. “माणसाला मर्यादा घालणाऱ्या अशा विशिष्ट प्रकारच्या संकुचित दृष्टिकोनावर सोशल मीडिया पोसला जातो. मी असं वाचलंय की, नकारात्मक वातावरणात सोशल मीडियाचा वापर अधिक वाढतो. नकारात्मक विचार यामुळे अशा प्रकारे एकत्रित येतात की त्याचा परिणाम फूट आणि विध्वंस असाच असतो,” असं शाहरुख खान कोलकात्यात चित्रपट महोत्सवामध्ये बोलत होता.