छोट्या पडद्यावरील ‘भाभीजी घर पर है’ ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला मलखान फेम अभिनेता दीपेश भान याचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. ते ४१ वर्षांचे होते. त्यानंतर आता या मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारणारे अभिनेते जीतू गुप्ता यांच्या १९ वर्षीय मुलाचे निधन झाले आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कॉमेडियन सुनील पाल यांनी याबद्दलची माहिती दिली.

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतील अभिनेता जीतू गुप्ता यांच्या मुलाचे नाव आयुष होते. तो १९ वर्षांचा होता. सुनील पाल यांनी जीतू यांची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जीतू गुप्ताचा मुलगा आता आपल्यामध्ये नाही. आयुषच्या आत्म्याला शांती मिळावी हीच इश्वरचरणी प्रार्थना, असे सुनील पाल यांनी म्हटले आहे.

तर जीतू गुप्ता यांनी त्यांच्या मुलाचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. ‘माझा बाबू आयुष आता या जगात नाही’, असे भावूक कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे. त्यांच्या या पोस्टनंतर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत श्रद्धाजंली वाहिली आहे.

दरम्यान जीतू गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या मुलाचा रुग्णालयातील एक फोटो फेसबुकवर शेअर केला होता. त्यावेळी आयुषला ऑक्सिजन लावला होता. तसेच तो व्हेंटिलेटरवर असल्याने प्रकृती नाजूक असल्याचे समोर आले होते.

अनेकजण मला त्याच्या प्रकृतीबद्दल विचारण्यासाठी वारंवार फोन करत आहेत. पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, देवाकडे त्याच्यासाठी प्रार्थना करा. कारण यावेळी त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे. मी अजिबात बोलण्याच्या मनस्थितीत नाही आणि इतके कॉल घेणेही यावेळी शक्य नाही, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते. आयुषच्या निधनाच्या वृत्तानंतर अनेकांना धक्का बसला आहे. अनेकजण त्यांच्या या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. तसेच अनेकांनी यावर श्रद्धांजली वाहिली आहे.