राज्यात करोनाचा कहर सुरुच आहे. मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांची आणि मृतांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे. करोना रुग्णांना वाचवण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र करोना रुग्णांच्या सेवेत उपस्थित असल्याचे दिसते. त्यांच्या कामगिरीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. भारतरत्न आणि भारताच्या गानकोकीळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायिका लता मंगेशकर यांनी पत्र लिहतं त्यांचे कौतुक केले आहे.

हे पत्र बीएमसीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. लता मंगेशकर यांनी BKC हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेश डेरे यांना हे पत्र लिहिले आहे. “डॉ. श्री राजेश डेरे, सादर प्रणाम ! आपण महाराष्ट्रासाठी, दिवसरात्र काम करत आहात, ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो, अशी मी मंगल कामना करते. घरात सर्वांना नमस्कार! आपली नम्र लता मंगेशकर,” असे लता मंगेशकर यांनी पत्रात लिहिले आहे. हे पत्र शेअर करत ते म्हणाले, “कौतुक करणारे हे शब्द फक्त डीन राजेश डेरे यांच्या कानावर संगीत नाही, तर एमसीजीएमच्या संपूर्ण टीमसाठी देखील आहे. कारण हे पत्र भारतरत्न लता मंगेशकर यांनी लिहिले आहे. लता जी तुमच्या शब्दांनी आमच्यात एक नवीन उर्जा निर्माण झाली आहे,” अशा आशयाचे ट्वीट बीएमसीने केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांनी करोना काळात मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीसाठी ७ लाख रुपये दिले.