राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच वादात अडकला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच तो ओटीटीवर प्रदर्शित करण्याची योजना आखली होती, त्यानंतर पीव्हीआर सिनेमाने त्याला विरोध केला होता. आता एक नवीन अपडेट समोर आली आहे की, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे आणि आता चित्रपटाची नवीन तारीख देखील समोर आली आहे.
चित्रपट कधी प्रदर्शित होईल?
पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, या चित्रपटाच्या रीलिजचे प्रकरण कोर्टात पोहोचले आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट थिएटरमध्येच रीलिज करावा लागणार आहे. या चित्रपटाची नवीन तारीखही समोर आली. ‘भूल चूक माफ’ आता २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. मॅडॉक फिल्म्स १५ मेपासून मार्केट कॅम्पेन सुरू करणार आहे.
लवकरच तो OTT वरदेखील उपलब्ध होईल
हिंदी चित्रपटांचे डिजिटल रिलीज थिएटरमधील रिलीजनंतर आठ आठवड्यांनी होते, परंतु न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘भूल चूक माफ’ केवळ दोन आठवड्यात म्हणजेच ६ जून २०२५ रोजी प्राइम व्हिडीओवर रिलीज होईल.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
राजकुमार राव आणि वामिका गब्बी स्टारर ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट आधी ९ मे रोजी प्रदर्शित होणार होता. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हा चित्रपट १६ मे २०२५ रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार होता. परंतु, पीव्हीआरने ‘भूल चूक माफ’च्या निर्मिती संस्थेच्या मॅडॉक फिल्म्सविरुद्ध ६० कोटी रुपयांचा खटला दाखल केला होता. तसेच त्यांनी न्यायालयाकडे चित्रपटाच्या डिजिटल प्रदर्शनाला स्थगिती देण्याची विनंती केली होती. याप्रकरणी कोर्टाने निर्णय दिला आहे. राजकुमार आणि वामिकाचा ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट थिएटरमध्ये 23 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
राजकुमार आणि वामिका व्यतिरिक्त, ‘भूल चुक माफ’मध्ये सीमा पाहवा, संजय मिश्रा, झाकीर हुसैन, जय ठक्कर, रघुबीर यादव यांच्याही भूमिका आहेत.