राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यातील तुटलेली युती, प्रचारादरम्यान या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांवर केलेली अतिशय तिखट टीका, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही ठिकाणी झालेली आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढे केलेला विकासाचा मुद्दा अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय समीकरणे बदलली असून गेली २५ वर्षे एकमेकांच्या हातात हात घालून निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने परस्परांशी काडीमोड घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली आहे. गेली २० वर्षे फडकणारा महानगरपालिकेवरील शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकणार की, भाजपचे कमळ फुलणार याची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मतदार राजा आज कोणाच्या पारड्यात वजन टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज सामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटीही त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहे. मात्र, काही सेलिब्रिटींना मतदानाचा हक्क असूनही आज मतदान करता येणार नसल्याचे दिसते. बॉलीवूडमधील काही प्रसिद्ध मंडळी त्यांच्या कामासाठी बाहेरगावी असल्याने त्यांना मतदान करता येणार नाहीये. आगामी रंगून या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता सैफ अली खान हे दिल्लीला गेले आहेत. तर अभिनेता संजय दत्त हा त्याच्या कुटुंबासह आग्रा येथे पोहचला आहे. प्रियांका चोप्रा ही तिच्या हॉलीवूड पदार्पणसाठी सज्ज झाली असून त्याचकरिता ती आता अमेरिकेत आहे. अभिनेता अजय देवगण आणि इमरान हाशमी हे त्यांच्या आगामी बादशाहो चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जोधपूर येथे गेले आहेत.

दरम्यान, गुलजार, अनुष्का शर्मा, रेखा,  शुभा खोटे यांनी सकाळीच मतदान करुन एका सुजाण नागरिकाचे कर्तव्य निभावले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदानास मुकलेल्या सेलिब्रिटींची यादी पुढीलप्रमाणे:
आमिर खान- बाहेरगावी
हृतिक रोशन- बाहेरगावी
अनुपम खेर- केपटाउन
ऋषी कपूर- हाँगकाँग
जावेद अख्तर-शबाना- बंगळुरु
अर्जुन कपूर- लंडन
संजय दत्त- आग्रा
अजय देवगण- जोधपूर
इमरान हाशमी- जोधपूर
दिया मिर्झा- आउटडोर शूट
सैफ अली खान- दिल्ली
कंगना रणौत – दिल्ली
अक्षय कुमार- भोपाल
प्रियांका चोप्रा- अमेरिका