करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हादरलाय. अशा परिस्थितीत विविध ठिकाणी ऑक्सिजन, बेड्स आणि औषधांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवतेय. ही कमतरता भरून काढण्यासाठी राज्य तसंच केंद्र सरकारही त्यांच्या परीने प्रयत्न करतच आहे. पण वाढत्या करोना रूग्णसंख्येच्या तुलनेने सरकारचे हे प्रयत्न तोडके पडत असल्यामुळे आता बॉलिवूडकरही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक कलाकार करोना रूग्णांच्या मदतीला धावून आले आहेत. मदत करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांच्या यादीत आता अभिनेते अनुपम खेर यांचं देखील नाव सामील झालंय. करोनामुळे कोलमडलेली आरोग्य व्यवस्था पुन्हा रूळावर आणण्यासाठी अभिनेते अनुपम खेर यांनी एक प्रोजेक्ट हाती घेतलाय. ‘प्रोजेक्ट हिल इंडिया’ असं या प्रोजेक्टचं नाव आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून करोना काळातील आवश्यक मदत आणि साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या प्रोजेक्टची माहिती देण्यासाठी स्वतः अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. गेल्या काही दिवसांपासून अभिनेते अनुपम खेर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरेच सक्रिय दिसून येत आहेत. या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर करत असतात. अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये बोलताना त्यांनी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबत माहिती दिली आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, “अमेरिकेमधली ग्लोबल कॅन्सर फाऊंडेशन आणि आणि ‘भारत फोर्ज’ यांच्यासोबत एकत्र येऊन कामाला सुरवात केली आहे. या माध्यमातून रूग्णालये आणि रूग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन कन्सट्रेटर्स, व्हेंटिलेटर्स, बॅगपॅक ऑक्सिजन मशीन, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर्स तसंच इतर आरोग्य सेवा मोफत देण्यात येणार आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेते अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यांच्या अनेक चाहत्यांनी आणि युजर्सनी या उपक्रमाबाबत कौतुक केलं. अनुपम खेर यांच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, अजय देवगण, सोनू सूद ,अक्षय कुमार, सलमान खान आणि विकास खन्ना हे कलाकार देखील करोना रूग्णांची मदत करताना दिसून येत आहेत.