बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सना ब्रेक मिळणं ही सध्याची फार किरकोळ बाब आहे. बहुतेक प्रत्येक अभिनेता आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या पहिल्या चित्रपटासाठी शब्द टाकतो किंवा स्वतः चित्रपटाची निर्मिती करतो. काही स्टारकिड्स हे केवळ स्वतःच्या बळावर पुढे आलेलेही आपण पाहिले आहेत. पण गेली काही वर्षं या नेपोटीजमकडे फार नकारात्मक पद्धतीने बघितलं गेलं आहे. किंग खान शाहरुख खानची दोन्ही मुलं इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यास तयार आहेत आणखीनही बऱ्याच कलाकारांची मुलं बॉलिवूडमध्ये येऊ पाहत आहेत, पण एका बॉलिवूड स्टारची मुलगी थेट हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं समोर आलं आहे.
सुप्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्ती आता मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. मिथुन यांच्या दोन मुलांना या क्षेत्रात अपयश आलं होतं पण आता मात्र दिशानी बॉलिवूडमधून नाही तर हॉलिवूडमधून या क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं म्हंटलं जात आहे. दिशानीने हॉलिवूडमध्ये ‘द गेस्ट’ या शॉर्टफिल्ममधून लोकांसमोर आली आहे. तिच्या कामाची बऱ्याच लोकांनी प्रशंसा केली आहे.
आणखी वाचा : मानधन परत करत सुपरस्टार चिरंजीवी आणि राम चरण यांनी घेतली चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी, म्हणाले…
फिल्ममेकिंगचे धडे गिरवण्यासाठी दिशानीने लॉस एंजलीस गाठलं. याधी दिशानीने न्यूयॉर्कच्या फिल्म इंस्टीट्यूटमधून अभिनय आणि चित्रपटनिर्मितीचं प्रशिक्षण घेतलं आहे. लॉस एंजलीसच्या ‘स्ट्रासबर्ग थिएटर एंड फिल्म इंस्टीट्यूट’ मधून दिशानी २ वर्षं शिकत होती. तिथे तिने चित्रपटनिर्मिती आणि अभिनयाशी निगडीत सगळ्या गोष्टी शिकल्या. आता तिच्याकडे हॉलिवूडचे दोन प्रोजेक्ट आहेत ज्यावर लवकरच काम सुरू होणार आहे. पहिल्या वर्षाच्या शेवटी दिशानीने तिथे एका नाटकात काम केलं, या नाटकात तिने हॉलिवूड स्टार अल पचीनोबरोबर काम केलं आहे. अभिनयाबरोबरच दिशानीला एक उत्तम लेखिका व्हायचं आहे.
‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार दिशानीने तिच्या वाडिलांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल भाष्य केलं आहे. दिशानी म्हणते, “मी माझ्या वाडिलांकडून मिळालेल्या सल्ल्यावर एक संपूर्ण पुस्तक लिहू शकते. त्यांनी एक खास सल्ला माझ्या भावांना आणि मला दिला तो असा की, तुम्ही पहिले चांगला माणूस म्हणून स्वतःला घडवा. चित्रपटसृष्टीतील बरीचशी मंडळी या गोष्टीकडे कानाडोळा करतात, पण मला मी माझ्या वडिलांनी दाखवलेल्या मार्गावरच चालणार हे नक्की.” लवकरच दिशानी बॉलिवूडच्या चित्रपटातही दिसू शकते.