९ नोव्हेंबर २००७ रोजी सुपरहिट ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४९ कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पदुकोणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. शाहरुखच्या मित्राची भूमिका त्याने साकारली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख खान आणि श्रेयस यांच्यात चांगली मैत्री झाली. इतकंच नाही तर श्रेयस या चित्रपटादरम्यान शाहरुखकडून एक मोठी गोष्ट शिकला.

श्रेयसने नुकतीच ‘मॅशेबल इंडिया’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ‘ओम शांती ओम’च्या शूटिंग दरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला. यादरम्यान शाहरुख खानने त्याला एक मोठा धडा दिला होता; तो म्हणजे कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा. त्याचं पालन श्रेयस आजही करण्याचा प्रयत्न करतो असा खुलासा त्याने केला.

आणखी वाचा : Video: रश्मिका मंदानाला पाहून श्रेयस तळपदे फिदा; म्हणाला, “सिर्फ मेरेकु देखि नहीं…”

श्रेयस म्हणाला, “तो एक रात्रीचा सीन होता त्यामुळे संध्याकाळी सात वाजता शूटिंग करायचं असं ठरलं होतं. दुसऱ्या प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी मला रात्री उशिरा २ वाजता बँकॉकला जायला निघायचं होतं. शाहरुख त्या दिवशी रात्री साडेआठ वाजता शूटसाठी आला होता. आमची दिग्दर्शिका फराह खान हिचा पारा हळूहळू चढला होता कारण तिला त्या सीनचं शूट लवकर पूर्ण करायचं होतं आणि मला २ वाजता विमानतळावर जायचं आहे या विचाराने ती खूप टेन्शनमध्ये आली होती. त्या दिवशी शाहरुखला सेटवर खूप उशीर झाला होता. शाहरुख साडेआठ वाजता सेटवर पोहोचला. तो आल्यावर चिडलेल्या फराह शाहरुखला म्हणाली, “श्रेयसला जायचं आहे. तू नेहमीच उशिरा येतोस. मला हा संपूर्ण करायचा आहे. आता आपण कसं करायचं?” त्यावर शाहरुख म्हणाला होता, “आज हा सीन आपण वेळेत पूर्ण करू.”

पुढे श्रेयस म्हणाला, “त्यादिवशी शाहरुख त्याच्या मेकअप रूममध्ये गेला नाही आणि संपूर्ण सीन २ ऐवजी दीड वाजेपर्यंत शूट केला. शूटिंग संपल्यावर शाहरुखने मला विचारलं की, “शूटिंग लवकर संपलं. अजून अर्धा तास बाकी आहे. आता काय करशील?” यावर मी त्याला म्हणालो, “मी सरळ विमानतळावरच जाईन. माझा दुसरा कोणताही प्लान नाही.” यावर शाहरुखने श्रेयसला एक मौल्यवान शिकवण दिली. तो म्हणाला, “मी हे शूट लवकर पूर्ण केलं जेणेकरून तू तुझ्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवू शकशील.” त्यावेळी माझी बायको दीप्ती मला विमानतळावर सोडायला येणार असल्याने ती सेटवर आली होती. पुढे शाहरुख म्हणाला होता, “थोडा वेळ आहे तर दिप्तीला कुठेतरी घेऊन जा तिच्यासोबत थोडा वेळ घालव. मी सुद्धा असेच करतो. गौरी आणि माझी मुलं सेटवर येतात. मग आम्ही काही वेळ एकमेकांसोबत घालवतो. थोड्या वेळाने ते घरी जातात आणि मी माझ्या पुढल्या शूटसाठी निघतो.”

हेही वाचा : रेशीमगाठ कायम राहणार! मालिका संपताना प्रार्थना बेहरे-श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिली गुड न्यूज, म्हणाले, “आम्ही लवकरच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर श्रेयसने शाहरुखने सांगितल्याप्रमाणे दीप्तीबरोबर थोडा वेळ घालवला आणि मगच तो दुसऱ्या प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी बँकॉकला गेला असा खुलासा श्रेयसने केला.