ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट थिएटर्समध्ये पाहिल्यानंतर सोशल मीडियावर यामधील डायलॉग व व्हीएफएक्सची चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असलेले डायलॉग ऐकून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. रामायणमधील हनुमान अशी भाषा खरंच बोलायचे का? असे प्रश्नही नेटकरी विचारत आहेत.
हेही वाचा- “रामायणबाबत कोणत्याही प्रकारचा….”; ‘आदिपुरुष’ चित्रपटावर ‘रामायण’ फेम अरुण गोविल भडकले
या संपूर्ण वादावर चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी प्रतिक्रियाही दिली. चित्रपटातील न आवडलेले संवाद काढून टाकले जातील असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मनोज यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘आदिपुरुषला होणारा प्रचंड विरोध पाहता मनोज मुंतशीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसमोर आपली बाजू मांडली. चाहत्यांची मनं दुखावणारे किंवा त्यांच्या भावना दुखावणारे सर्व डायलॉग काही दिवसात बदलले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी चाहत्यांना दिली.
मनोज मुंतशीर यांनी या चित्रपटात ४ हजारहून अधिक संवाद लिहिले आहेत. मात्र त्यांनी लिहिलेल्या 5 डायलॉग्सवर लोकांचा आक्षेप आहे. आठवडाभरात हे संवाद बदलले जातील अशी ग्वाही मनोज यांनी दिली आहे.
हेही वाचा- “हनुमान बहिरे होते…” ‘आदिपुरुष’ दिग्दर्शक ओम राऊतचे ‘ते’ जुने ट्वीट चर्चेत
मनोज यांची ओळख राष्ट्रवादी विचारधारेचे लेखक अशी आहे, आणि आता या चित्रपटामुळे त्यांच्याच प्रतिमेला धक्का लागल्याने त्यांचे चाहते नाराज झाले आहेत. चित्रपटातील संवादांमुळे बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास, क्रीती सेनॉन, सैफ अली खान आणि देवदत्त नागे मुख्य भूमिकेत आहेत.