Ajay Devgn Took Adviced From An Astrologer : बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी नशीब आणि ग्रहांवर विश्वास ठेवतात आणि नशिबी चांगले योग यावेत या आशेने ते त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्येही बदल करतात. या कलाकारांपैकी बरेच जण ज्योतिषांचा सल्ला घेतात आणि सेलिब्रिटी ज्योतिषी त्यांना सल्ला देण्यासाठी भरपूर मानधनसुद्धा घेतात.

अलीकडील एका अहवालानुसार, सेलिब्रिटी ज्योतिषी संजय बी. जुमानी यांचे मूळ सल्लामसलत शुल्क १२,३०० रुपये इतके आहे, ज्यामध्ये ते फक्त १० मिनिटांचा वेळ देतात. ते एक इतर पॅकेजदेखील देतात, ज्याची किंमत २३,१०० आहे, ज्यामध्ये ऑडिओ किंवा व्हिडीओद्वारे सल्ला दिला जातो आणि काही वैयक्तिक प्रश्नांची उत्तरेही दिली जातात. ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’च्या वृत्तानुसार जुमानी यांच्यासारखे ज्योतिषी या सर्व गोष्टी खूप गुपित ठेवतात; इतक्या की, त्यांच्या पत्नीलाही त्यांच्या क्लायंटबद्दल माहिती नसते.

अजय देवगणने आडनावाच्या स्पेलिंगमध्ये केलेला बदल

जुमानी यांनी सांगितलेलं की, अजय देवगणला आडनावातील स्पेलिंगमध्ये बदल करण्याचा सल्लाही त्यांनीच दिला होता. अभिनेत्याने त्याच्या देवगण (Devgan) या आडनावातून ‘A’ काढल्यानंतर त्याचे चित्रपट ५०० कोटींचं कलेक्शन करतील, असं म्हटलेलं. एवढंच काय तर त्यांनी असंही सांगितलं की, त्यांनी अक्षय कुमारबद्दल भविष्यवाणी केली होती की, वयाच्या ४५ व्या वर्षी त्याचा चित्रपट पहिल्यांदा १०० कोटींची कमाई करील.

सुदीप कोचर या अजून एका सेलिब्रिटी ज्योतिषांनी असं भाकीत केलं होतं की, दीपिका पादुकोण बॉलीवूडमधील टॉपची अभिनेत्री बनेल आणि ती ऐश्वर्या रायप्रमाणे एक चांगली अभिनेत्री होईल. त्यासह त्यांनी असंही म्हटलं की, त्यांनी माधुरी दीक्षित यूएसला गेल्यानंतर पुन्हा बॉलीवूडमध्ये पुनरागमन करील,असंही सांगितले आणि तसं झालंसुद्धा.

सुदीप यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दलही सांगितलेलं. त्यांनी असं म्हटलं की, जेम्स (Gems) अमिताभ बच्चन यांच्यासाठी फायदेशीर ठरले. त्यांना खूप महत्त्व असतं; पण याचा अर्थ असा नाही की, कोणीही ते परिधान केल्यानंतर ते अमिताभ यांच्यासारखेच होतील. त्यामुळे अमिताभ बच्चन यांची प्रकृती चांगली राहते आणि म्हणूनच वयाच्या ८२ व्या वर्षीसुद्धा त्यांच्यामध्ये काम करण्यासाठी इतकी ताकद उत्साह आहे.