वर्षा भरतच्या नुकत्याच आलेल्या ‘बॅड गर्ल’ या तमिळ चित्रपटात एका अभिनेत्रीने लक्ष वेधलं. या चित्रपटात नायिकेच्या आईची भूमिका अभिनेत्री शांती प्रियाने साकारली आहे. शांती प्रियाने ९० च्या दशकात बरेच हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपट केले. ती अक्षय कुमारची पहिली सह-कलाकार होती. तिने १९९१ मध्ये ‘सौगंध’ या अॅक्शन चित्रपटातून अक्षय कुमारबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या शांती प्रियाच्या वैयक्तिक आयुष्यात एक धक्कादायक घटना घडली, ज्यातून सावरायला तिला बरीच वर्षे लागली.

शांती प्रिया ही अभिनेत्री भानुप्रियाची धाकटी बहीण आहे. तिने रेलांगी नरसिंह राव यांच्या १९८७ च्या तेलुगू कॉमेडी कबोये अल्लुडू मधून अभिनयात पदार्पण केले. त्याच वर्षी, तिने गंगई अमरनच्या एन्गा ओरू पट्टुकरन या रोमँटिक चित्रपटातून तमिळ इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

शांती प्रियाने बरीच वर्षे तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचबरोबर १९८९ च्या पौराणिक टीव्ही शो ‘विश्वामित्र’ मध्ये शकुंतलाची भूमिकाही साकारली. दोन वर्षांनंतर तिने ‘सौगंध’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यात तिने अक्षय कुमारच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. नंतर तिने ‘मेरे सजना साथ निभाना’ मध्ये मिथुन चक्रवर्तींबसह काम केलं.

१९९२ च्या तमिळ चित्रपट ‘उयर्थवन’ नंतर शांती प्रियाने दाक्षिणात्य चित्रपटात काम करणं थांबवलं आणि ती पूर्णपणे हिंदी चित्रपटांकडे वळली. अशोक गायकवाड यांच्या १९९३ च्या ‘फूल और अंगार’ मध्ये तिने मिथुनसह काम केलं. त्याच वर्षी के रविशंकर यांच्या ‘मेहरबान’ मध्ये त्यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

शांती प्रियाने त्याच वर्षी शिबू मित्राच्या ‘वीरता’ चित्रपटात प्रोसेनजीत चॅटर्जीबरोबर रोमान्स केला. त्यानंतर १९९४ मध्ये ती ‘इक्के पे इक्का’ या अॅक्शन चित्रपटात झळकली. त्यानंतर तिने लग्न केलं. मग ती आई झाली आणि तिने आठ वर्षे अभिनयातून ब्रेक घेतला.

शांती प्रियाने १९९२ मध्ये दिग्गज अभिनेते व्ही शांताराम यांचा नातू अभिनेता सिद्धार्थ रे याच्याशी प्रेमविवाह केला. सिद्धार्थ रे हा १९९३ मध्ये अब्बास-मस्तानच्या रोमँटिक थ्रिलर ‘बाजीगर’ मध्ये इन्स्पेक्टर करणच्या भूमिकेसाठी ओळखला जातो.

शांती प्रिया व सिद्धार्थचं लग्न

“एका कार्यक्रमात आम्ही भेटलो. मी त्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि मला फार खास वाटलं. तो चित्रपटसृष्टीतील एका मोठ्या कुटुंबातून आला होता, पण त्याच्यात तो अॅटिट्यूड नव्हता. तो खूप साधे कपडे घालायचा. नंतर आमची ओळख झाली आणि पहिल्या भेटीनंतर वर्ष व्हायच्या आत आम्ही लग्न केलं,”

शांती प्रियाने अभिनयातून घेतला ब्रेक

“माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि मला वैवाहिक जीवन एन्जॉय करायचं होतं. मुंबई माझ्यासाठी पूर्णपणे नवीन ठिकाण होतं. मी दक्षिण भारतीय होते. तो महाराष्ट्रीय व बंगाली होता. त्यामुळे मला त्याची संस्कृती शिकायची होती, सगळं समजून घेऊन संसार करायचा होता. मला त्याने इंडस्ट्री सोडायला सांगितलं नव्हतं,” असं शांती प्रिया म्हणाली होती.

हार्ट अटॅकने सिद्धार्थ रे याचे निधन

शांती प्रिया व सिद्धार्थ यांचं लग्न झालं, त्यांना दोन मुलं झाली. पण २००४ मध्ये सिद्धार्थला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. “ते खूप धक्कादायक होतं. संध्याकाळची वेळ होती… जेवणाची वेळ होती. तो माझ्या धाकट्या मुलाला काहीतरी शिकवत होता. आम्ही सगळे जेवणाच्या टेबलावर बसलो होतो. मी, तो आणि आमची दोन्ही मुलं. त्याला अचानक उचकी आली आणि त्याने डोकं खाली टेकवलं,” असं सिद्धार्थच्या मृत्यूचा दिवस आठवत शांती प्रिया म्हणाली होती.

“तो अगदी सहज, कोणत्याही त्रासाशिवाय गेला, पण मी ते कधीच विसरू शकत नाही. त्याला तसं पाहून मला काहीच सुचत नव्हतं, मी काहीच करू शकत नव्हते. माझी मदतनीस आली, तिने त्याला जिवंत करण्यासाठी काही प्रयत्न केले. पण काहीच फायदा झाला नाही,” असं शांती प्रियाने सांगितलं होतं.

पतीच्या निधनाबद्दल ती म्हणाली, “मला हतबल दिसायचं नव्हतं. मला कोणाचीही मदत घ्यायची नव्हती. सर्व विधी संपल्यानंतर, मला अचानक जाणवलं की ‘तो आता आमच्याबरोबर नाही.’ माझ्या आईने मला विचारलं की मी तिच्याबरोबर परत जाणार का, मी नकार दिला. मी आतून हादरले होते, तरी इतरांना ते जाणवू दिलं नाही.”