Chhaava Movie : ‘छावा’ चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा प्रेक्षकांना लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. यापूर्वी हा चित्रपट डिसेंबर महिन्यात दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ बरोबर क्लॅश होणार होता. मात्र, कालांतराने निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट बदलली आणि आता हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला जगभरात प्रदर्शित होणार आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आणि ट्रेलरची घोषणा ‘मॅडॉक फिम्स’कडून करण्यात आली होती. उद्या ( २२ जानेवारी २०२५ ) या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची ऐतिहासिक भूमिका अभिनेता विकी कौशल साकारणार आहे. तर, महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे.

प्रेक्षकांना याआधी ‘छावा’च्या टीझरमध्ये औरंगजेबाची झलक पाहायला मिळाली होती. औरंगजेबाची भूमिका साकारणारा हा बॉलीवूड अभिनेता कोण आहे याचा खुलासा ‘मॅडॉक फिम्स’ने नवीन पोस्ट शेअर करत केला आहे. ‘छावा’मध्ये औरंगजेबाची भूमिका बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्ना साकारणार आहे.

औरंगजेबाच्या डोळ्यात द्वेष, चेहऱ्यावर तिरस्काराचे भाव असा लूक पोस्टरवर पाहायला मिळत आहे. “डर और देहशत का नया चेहरा – मुघल शहेनशाह औरंगजेब, मुघल साम्राज्याचा निर्दयी शासकाची भूमिका साकारणार अक्षय खन्ना” असं कॅप्शन ‘मॅडॉक फिम्स’ने या पोस्टरला दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांसह अनेक दमदार कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. याशिवाय संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार सुद्धा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.