This Bollywood Actress Will Replace Deepika Padukone In Kalki 2898 AD : दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘स्पिरिट’ व ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटांतील एक्झिटमुळे चर्चेत आहे. दिवसाला फक्त ८ तास काम करण्याची मागणी त्यावेळी अभिनेत्रीने केली होती, ज्यानंतर अनेकांनी त्यांच्या याबद्दलच्या विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अशातच आता ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाच्या सिक्वलबद्दल एक अपडेट समोर आली आहे.

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट जून २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार या चित्रपटाने तेव्हा भारतात ६४६.३१ कोटी इतकी कमाई केलेली. अशातच या चित्रपटाच्या सिक्वलची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकाने यामधून एक्झिट घेतल्याचं वृत्त समोर आलेलं.

‘कल्की २८९८ एडी’च्या सिक्वलमध्ये आलिया भट्ट झळकणार?

दीपिका पादुकोणने संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरीट’ चित्रपटातून एक्झिट घेतल्यानंतर दिग्दर्शकाने तिच्या जागी बॉलीवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीची निवड केली. याबद्दल त्यांनी स्वत: पोस्ट करत माहिती दिलेली. त्यानंतर आता नाग अश्वीन (Nag Ashwin) दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाच्या सिक्वलमधून दीपिकाने घेतलेल्या एक्झिटनंतर तिच्याजागी दुसऱ्या बॉलीवूड अभिनेत्रीची निवड करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. ‘लेट्स सिनेमा’च्या माहितीनुसार ‘कल्की २८९८ एडी’च्या सिक्वलमध्ये दीपिकाच्या जागी अभिनेत्री आलिया भट्ट झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या चित्रपटासंदर्भात आलियाबरोबर मेकर्सची बोलणी सुरू आहेत. परंतु, अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अलीकडेच या चित्रपटाच्या मेकर्सने दीपिका पादुकोण या चित्रपटाच्या सिक्वलचा भाग नसल्याची अधिकृत माहिती दिली होती, त्यानंतर आता दीपिकाच्या जागी आलियाच्या नावाची चर्चा होताना दिसतेय; त्यामुळे यामध्ये प्रभासबरोबर आलिया भट्ट झळकणार का याचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाचा सिक्वल २०२६मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, दीपिका पादुकोणच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री येत्या काळात शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटातून झळकणार आहे. यासह ती दाक्षिणात्य अभिनेता अल्लु अर्जुन व अ‍ॅटलीच्या AA22xA6 या चित्रपटातूनही झळकणार आहे.