Amitabh Bachchan on Relationship with Rekha : अमिताभ बच्चन व रेखा यांच्या ब्रेकअपला इतकी वर्षे लोटली असली तरी अजूनही त्यांच्याबद्दल चर्चा होत असते. खासकरून ऑक्टोबर महिन्यात या दोघांची प्रेमकहाणी चर्चेत येते. त्याचं कारण म्हणजे रेखा व अमिताभ बच्चन यांचे एकापाठोपाठ असलेले वाढदिवस. १० ऑक्टोबरला रेखा यांचा तर ११ ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असतो.

एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघे ब्रेकअपनंतर कधीच एकत्र काम करताना दिसले नाहीत. एकाच कार्यक्रमाला रेखा व अमिताभ बच्चन बरेचदा हजेरी लावतात, पण अंतर ठेवून असतात. रेखा अमिताभ बच्चन यांच्यावरचं प्रेम व्यक्त करत असतात. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना त्या भेटतात. जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय व आराध्या यांना रेखा भेटतात, त्यांची प्रेमाने विचारपूस करतात.

अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे, हे रेखा जाहिरपणे बोलून दाखवतात. नात्यात होत्या तेव्हाही त्या बोलायच्या आणि आताही व्यक्त होतात. दुसरीकडे अमिताभ बच्चन रेखाबद्दल बोलणं कायम टाळायचे. पण सिमी गरेवालने अमिताभ बच्चन यांना रेखाबरोबरच्या नात्याबद्दल मुलाखतीत थेट विचारलं होतं.

अभिनेत्री सिमी गरेवालने रेखा तसेच अमिताभ बच्चन व जया यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. सिमीने १९९८ मध्ये अमिताभ बच्चन यांची मुलाखत घेतली होती, तेव्हाची आठवण तिने रेडिफशी बोलताना सांगितली होती. त्या काळी बच्चन यांचे चित्रपट फार चालत नव्हते आणि त्यांची निर्मिती कंपनी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडची (ABCL) परिस्थिती फार चांगली नव्हती, त्यामुळे ते संघर्ष करत होते. त्यावेळी बिग बींचा आत्मविश्वास डगमगला होता, असं सिमीने सांगितलं.

amitabh bachchan comment on rekha
रेखा व अमिताभ बच्चन

मुलाखतीआधी सिमीने घेतलेली बिग बींची भेट

मुलाखतीची खूप तयारी केली होती, मुलाखतीआधी एकदा अमिताभ बच्चन यांनी भेट घेतली होती, असं सिमी म्हणाली होती. “मी त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, ‘अमितजी, तुम्ही या मुलाखतीत १०० टक्के द्यावे आणि प्रामाणिक राहावं असं मला वाटतं. त्यावर ते म्हणाले ‘मी १०० टक्के देईन, मी जसा आहे तसाच मुलाखतीत असेन,” अशी आठवण सिमीने सांगितली होती.

रेखाबद्दल काय म्हणाले होते अमिताभ बच्चन?

रेखाबरोबरच्या नात्याबद्दल विचारलं असता “ती माझी सहकलाकार आणि सहकारी आहे. आणि जेव्हा आम्ही एकत्र काम करत होतो, तेव्हा साहजिकच आम्ही एकमेकांना भेटलो होतो. आमच्यात काहीच साम्य नाही. काहीवेळा आपण एखाद्या कार्यक्रमात, म्हणजे एखाद्या पुरस्कार सोहळ्यात वगैरे भेटतो तेवढंच,” असं अमिताभ बच्चन सिमी गरेवालला म्हणाले होते.