South Superstar Mohanlal Praises Amitabh Bachchan : बिग बी अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा केला. वयाच्या ८३ व्या वर्षीसुद्धा बिग बी तितक्याच उत्सुकतेने आणि आनंदाने त्यांचं काम करताना दिसतात. आजही ते अनेकांना त्यांच्या कामातून प्रेरणा देतात. त्यामुळे फक्त त्यांचे चाहतेच नाही, तर मोठमोठ्या कलाकारांनाही त्यांचं कौतुक करण्याचा मोह आवरत नाही.

अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. या शोमधील भागात बिग बींचा वाढदिवसदेखील साजरा करण्यात आला. यावेळी जावेद अख्तर व फरहान अख्तर यांनी हजेरी लावलेली. बिग बींचा वाढदिवस अजून खास करण्यासाठी त्या भागात दादासाहेब फाळके पुरस्कारविजेते मोहनलाल यांनीदेखील व्हिडीओमार्फत बिग बींना शुभेच्छा दिल्या.

मोहनलाल यांनी केलं अमिताभ बच्चन यांचं कौतुक

मोहनलाल यांनी यावेळी बिग बींचं कौतुक केलं. मोहनलाल यावेळी अमिताभ बच्चन यांना म्हणाले, “प्रिय अमितजी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात. तुमची शिस्तप्रियता, माणुसकी, ताकद हे सगळे गुण लोकांनी शिकण्यासारखे आहेत. तुमच्याबरोबरच्या प्रत्येक संवादामधून मला शिकायला मिळतं की, तुमच्या प्रवासातून किती गोष्टी आत्मसात करण्यासारख्या आहेत. तुमचं आरोग्य छान राहो आणि तुम्ही सदैव आनंदी राहावं अशी इच्छा.”

मोहनलाल यांनी कौतुक केल्यानंतर अमिताभ बच्चन त्यांना धन्यवाद देत म्हणाले, “खूप खूप धन्यवाद मोहनलालजी.” पुढे ते जावेद अख्तर यांच्याकडे वळत त्यांना मोहनलाल यांच्याबद्दल सांगत म्हणाले, “सर, त्यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. ते खूप उत्तम अभिनेते आहेत. तुम्ही त्यांना कुठलीही भूमिका द्या, ते चोखपणे ती भूमिका वठवतात.”

मोहनलाल यांना नुकतच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी ‘दूरदर्शन’ला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन त्यांचं प्रेरणास्थान असून, ते हिंदी सिनेमातील त्यांचे आवडते कलाकार असल्याचं सांगितलेलं. त्यावेळी मोहनलाल अमिताभ यांच्याबद्दल म्हणालेले, “प्रत्येक कलाकार त्यांच्या दृष्टीने चांगलेच असतात; पण मला जर कोणा एकाची निवड करायला सांगितली, तर मी अमिताभ बच्चन यांनी निवड करेन. ते आपल्या देशातील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक आहेत. गेली कित्येक दशकं ते त्यांच्या वैविध्यपूर्ण अभिनयानं मनोरंजन करीत आहेत.”