Anubhav Sinha Ajay Devgan haven’t talked for 18 years : एखादा चित्रपट फ्लॉप झाला की त्याच्या अपयशाची जबाबदारी कलाकारांइतकीच दिग्दर्शकावरही असते. अनुभव सिन्हा यांनी Ra. One, मुल्क व आर्टिकल 15 असे हटके चित्रपट केले आहेत. त्यांनी आपल्या करिअरचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट अजय देवगणबरोबर केला. या चित्रपटानंतर अजय देवगण व अनुभव सिन्हा एकमेकांशी आजपर्यंत बोलले नाहीत. या गोष्टीला आता १८ वर्षे झाली आहेत.

उल्टा चष्मा (यूसी) या यूट्यूब चॅनलशी बोलताना अनुभव म्हणाले की कॅश चित्रपट फ्लॉप झाल्याचा त्यांच्या व अजय देवगणच्या नात्यावर परिणाम झाला. दोघे पुन्हा कधीच भेटले नाहीत. “अजय देवगण हा खूप चांगला माणूस आहे. पण कधीकधी जेव्हा चित्रपट चांगले चालत नाहीत तेव्हा टीम वेगळ्या होतात. मी त्याच्याबरोबर माझ्या करिअरमधील सर्वात वाईट चित्रपट ‘कॅश’ बनवला. तो खूप वाईट चित्रपट आहे आणि टीममधील सदस्यांना त्यासाठी नाराज व्हायचा पूर्ण अधिकार आहे. तो एक बेजबाबदार चित्रपट होता. त्या चित्रपटानंतर अजय आणि मी वेगळे झालो. आम्हाला पुन्हा कधीही एकमेकांना भेटण्याची संधी मिळाली नाही,” असं अनुभव सिन्हा यांनी नमूद केलं.

द लल्लनटॉपशी बोलताना अनुभव यांनी सांगितलं की अजय देवगण त्यांच्याशी मागील १८ वर्षांपासून बोलत नाही. “आम्ही कधीही भांडलो नाही. तो माझ्याशी बोलत नाही आणि मला त्याचं कारण माहित नाही. आम्ही ‘कॅश’ सिनेमा बनवल्यानंतर भेटलोच नाही, त्यामुळे तो माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे असंही मी म्हणू शकत नाही. कदाचित मी जास्त विचार करत आहे. मी त्याला अनेक मेसेज पाठवले, पण त्याने कधीच उत्तर दिले नाही. म्हणून मी स्वतःला समजावलं की कदाचित माझे मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचले नसतील. पण १८ वर्षे झाली आहेत, आम्ही बोललो नाही,” असं अनुभव सिन्हा म्हणाले.

‘कॅश’मध्ये अजय देवगणबरोबर सुनील शेट्टी, ईशा देओल, रितेश देशमुख, झायेद खान, शमिता शेट्टी, आयशा टाकिया आणि दिया मिर्झा हे कलाकार होते. अनुभव सिन्हा यांनी चित्रपटाचे चित्रीकरण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये केले होते. या चित्रपटाची कथा दमदार नसल्याने तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.