Anupam Kher post on Operation Sindoor: काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ ला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांनी त्यांचे जीव गमावले होते. त्यानंतर संपूर्ण भारतातून संताप व्यक्त केला जात होता.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले होते. आता भारत सरकारने या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी मध्यरात्री भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या काही तळांवर भारताने हल्ले केले आहेत. एका गुप्त मोहिमेच्या अंतर्गत हा एअर स्ट्राईक केला गेला आहे. या लष्करी कारवाईचे नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असे होते.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अनेक कलाकारांनी भारताच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. रितेश देशमुख, अनुपम खेर, निम्रत कौर, विवेक अग्निहोत्री, मधुर भांडारकर, काजल अग्रवाल, चिरंजीवी अशा अनेक कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अनुपम खेर यांनी ‘भारत माता की जय’ म्हणत शेअर केली पोस्ट
बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ असे लिहिलेली एक पोस्टर शेअर केली. तसेच भारतमाता की जय असे पार्श्वभूमीवर ऐकू येत आहे. त्यांनी ही पोस्टर शेअर करताना ‘भारतमाता की जय’ अशी कॅप्शन लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी ‘जय हिंद’, ‘जय हिंद जय भारत’ अशा कमेंट केल्या आहेत.
तसेच चिरंजीवी यांनी ‘जय हिंद’ असे लिहीत ‘ऑपरेशन सिंदूर’ असे लिहिलेले पोस्टर शेअर केले आहे. तापसी पन्नू, काजल अग्रवाल यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. मधुर भांडारकर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ असे लिहिलेले पोस्टर शेअर करीत लिहिले की, आमच्या प्रार्थना भारतीय सैन्याबरोबर आहेत. एक राष्ट्र म्हणून आपण एकत्र आहोत. जय हिंद, वंदे मातरम! असे म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर अनेक कलाकारांनी पाकिस्तानला याचे उत्तर दिले पाहिजे. संजय दत्तने सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करीत लिहिले होते की, त्यांनी आपल्या लोकांना निर्दयीपणे मारले. हे माफ केले जाऊ शकत नाही. आपण शांत बसणार नाही, हे या दहशतवाद्यांना माहीत असण्याची गरज आहे. याचा बदला घेण्याची गरज आहे.
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील बहावलपूर, मुरिदके, गुलपूर, भीमबर, चम अमरू, बाग, कोटली, सियालकोट, मुजफ्फराबाद या नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला गेला आहे.