अनुराग कश्यप हा बॉलीवूडमधील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक आहे. अनुराग अनेकदा बॉलीवूडमध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल स्पष्ट वक्तव्य करीत असतो. अनुरागनं नुकतंच मार्च २०२५ मध्ये बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला. एवढंच नव्हे, तर त्यानं मुंबई शहरदेखील सोडलं असून, सध्या तो बंगळुरूमध्ये राहत असल्याचं म्हटलं जातं. अनुराग शेवटचा ‘रायफल क्लब’ व ‘महाराजा’ या चित्रपटांमधून झळकला होता.
अशातच अनुराग कश्यप आता चर्चेत आला आहे ते त्यानं केलेल्या एका वक्तव्यामुळे. ‘द हिंदू’ आयोजित कार्यक्रमात अनुरागनं त्याच्या व्यावसायिक, तसेच खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. तो म्हणाला, ” ‘इमाइक्का नोडिगल’ या चित्रपटानंतर मला अनेक दाक्षिणात्य चित्रपटांसाठी विचारणा झाली होती. तर ‘महाराजा’ चित्रपटासाठी मी सुरुवातीला तितका उत्सुक नव्हतो.” त्यासह अनुरागनं त्याच्या ‘केनेडी’ चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनदरम्यान दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती यांनी मदत केल्याचं सांगितलं आहे. तर विजय यांच्याबद्दल सांगत असताना मुलीच्या लग्नासाठीसुद्धा त्यांनी मदत केल्याचं अनुरागनं म्हटलं आहे.
‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग म्हणाला, “मी विजय सेतुपतीला माझ्या मुलीच्या लग्नाविषयी सांगितलं होतं आणि म्हणालो होतं की, पुढच्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न आहे; पण मला वाटत नाही की, मी तिच्या लग्नाचा खर्च उचलू शकेन. तेव्हा विजय सेतुपती यांनी मला काम मिळवून देण्यात मदत केली. अनुराग कश्यप व विजय सेतुपती ‘महाराजा’ या चित्रपटात एकत्र पाहायला मिळाले होते.
अनुरागची मुलगी आलियाचं डिसेंबर २०२४ साली लग्न झालं. तिनं वयाच्या २३ व्या वर्षी तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयर याच्याशी लग्नगाठ बांधली. अनुराग कश्यपचं पहिलं लग्न आरती बजाजबरोबर झालं होतं. आलिया ही अनुराग व आरती यांची मुलगी आहे; परंतु त्या दोघांनी २००९ साली घटस्फोट घेतला. पुढे अनुरागनं कल्की कोचलिन हिच्याशी दुसरं लग्न केलं होतं आणि २०१५ साली त्या दोघांचाही घटस्फोट झाला.
दरम्यान, अनुरागच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर ‘पांच’ हा त्याच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. परंतु, त्या पहिल्याच चित्रपटावेळी तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यानंतर त्यांने ‘बॉम्बे टॉकीज’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘मनमर्जियान’, ‘घोस्ट स्टोरीज’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘केनेडी’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.