ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर ७३ वर्षांचे झाले आहेत. त्यांना तीन अपत्ये असून सर्व फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहेत. राज यांना नादिरा बब्बर यांच्याबरोबरच्या पहिल्या लग्नापासून जूही बब्बर आणि आर्य बब्बर ही दोन अपत्ये आहेत. तर दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याबरोबरच्या दुसऱ्या लग्नापासून प्रतीक बब्बर हा मुलगा आहे. आर्य बब्बरने त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

आर्य बब्बर स्मिता पाटील व राज बब्बर यांच्या लग्नाबद्दल म्हणाला, “हा आमच्या आयुष्याचा एक भाग आहे आणि आम्ही त्याकडे तसंच पाहतो. मला वाटतं आम्ही सर्वजण, खासकरून मी त्या सर्व गोष्टी पाहत मोठा झालो. खरं तर याला खूप काळ उलटलाय, पण आता आम्ही त्यातील फक्त सकारात्मक गोष्टी पाहतो एवढंच. हे ऐकून माझ्या आईला फार आनंद होणार नाही, पण मला वाटतं की मी माझ्या वडिलांच्या सर्वात जवळ आहे.”

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आर्य म्हणाला की, तो त्याच्या वडिलांकडे वडील नाही तर मित्र म्हणून जास्त पाहतो. तसेच तो त्याच्या वडिलांचा खूप आदर करतो.

वडिलांशी कोणत्याही गोष्टीबद्दल बोलू शकतो आर्य

आर्यने वडिलांना मित्र म्हटलं. तसेच त्यांच्याबरोबर विनोद करू शकतो, क्रिएटिव्ह गोष्टींबद्दल त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो, त्यांच्यावर अवलंबून राहू शकतो, असंही आर्यने नमूद केलं. वडिलांवर डोळे बंद करू विश्वास ठेवू शकतो, कारण ते नेहमीच पाठीशी उभे राहतील याची खात्री असल्याचं आर्य म्हणतो. आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती वडील असल्याचं आर्यने नमूद केलं.

आर्यचा सावत्र भाऊ प्रतीक बब्बर आहे. प्रतीकने अलीकडेच त्याचं नाव बदललं. त्याने वडील राज बब्बर यांचं नाव हटवून स्वतःचं नाव प्रतीक स्मिता पाटील असं ठेवलं. याबद्दल आर्यने नाराजी व्यक्त केली. प्रतीकने १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं. त्या लग्नात बब्बर कुटुंबाला बोलावलं नव्हतं, त्याबद्दल आर्यने प्रतिक्रिया दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाला होता आर्य बब्बर?

“आमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना, माझी आई (नादिरा बब्बर), माझी बहीण (जुही बब्बर) किंवा मला लग्नाला न बोलावणं समजू शकतो. कदाचित आम्ही एक कुटुंब म्हणून कुठेतरी कमी पडलो असू. पण आम्ही त्याला कधीही सावत्र भाऊ मानलं नाही. पण ठिके. कदाचित, आमच्याकडून काही चूक झाली असेल. पण पप्पा? पप्पांना लग्नाचं निमंत्रण दिलं नाही. ते त्याचेही वडील आहेत. तो असं कसं करू शकतो? पप्पा खूप दुखावले आहेत. असं करून प्रतीकने त्याच्या आई स्मिता पाटीलजींनाही दुखावलं आहे. जर त्याने क्षणभर याचा विचार केला तर त्याला कळेल की त्याची आई, ज्यांचा तो खूप आदर करतो आणि प्रेम करतो; त्यांनाच त्याने दुखावलं आहे,” असं आर्य बब्बर म्हणाला.