बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन व दीपिका पदुकोणचा ‘फायटर’ चित्रपट आज (२५ जानेवारीला) प्रदर्शित झाला. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेष करून या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहेत. अनेकांनी या चित्रपटातील गाण्यावर रील बनवली आहेत. आता कलाकारांनाही ‘फायटर’मधील गाण्यांची भूरळ पडल्याचे दिसून येत आहे.
अभिनेता आयुष्मान खुरानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याची मुलगी वरुष्काबरोबर ‘फायटर’ मधील ‘शेर खुल गये’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे. आयुष्मानची पत्नी ताहिरा कश्यपने आपल्या इन्स्टाग्रामवर आयुष्मान व वरुष्काचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले, “घरातील वाघ समोर आले आहेत, हृतिक आणि दीपिका पदुकोण, हे लोक तुमच्या डान्स स्टेप्स फॉलो करत नाहीत, कारण ते तसा डान्स करू शकत नाहीत.” आयुष्मानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.
आयुष्मान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत अनेकदा तो आपल्या कुटुंबाबरोबरही वेळ घातवताना दिसतो. आयुष्मानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर गेल्यावर्षी २४ ऑगस्टला त्याचा ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्याबरोबर अनन्या पांडेची प्रमुख भूमिका होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. मात्र, अद्याप आयुष्मानने त्याच्या अगामी प्रोजक्टची कोणतीही घोषणा केलेली नाही.
‘फायटर’ चित्रपटात ऋतिक रोशनबरोबर दीपिका पदुकोण, अनिल कपूर यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका व हृतिकने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटात हृतिकने स्क्वॉड्रन लीडर ‘शमशेर पठानिया’ची भूमिका साकारली आहे. देशभक्तीवर आधारित असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.