कोणत्याही नात्यात महत्त्वाचा असतो तो विश्वास. एखाद्या नात्यात जिथे खोटेपणा येतो, तिथे ते नातं संपतं. आजतर नात्यातील फसवाफसवी आणि खोटेपणाबद्दलच्या अनेक बातम्या पाहायला मिळतात. अशाच खोटेपणाचा बळी ठरलेला एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता. लग्नाच्या वीस वर्षांनंतर अभिनेत्याला त्याच्या पत्नीविषयी एक सत्य कळलं होतं आणि हे सत्य होतं त्याची पत्नी त्याची नसल्याचं. हा अभिनेता म्हणजे दीपक तिजोरी.
दीपक तिजोरी हा १९९० च्या दशकातील आघाडीचा अभिनेता होता. दीपक ‘आशिकी’ चित्रपटातील ‘बाळू’पासून ते ‘जो जीता वही सिकंदर’मधील शेखर मल्होत्रा आणि ‘कभी हा कभी ना’मधील ख्रिस रॉड्रिग्जपर्यंत अनेक भूमिकांमध्ये दिसला आहे. याशिवाय त्याने ‘फरेब’, ‘टॉम, डिक अँड हॅरी’सारखे काही चित्रपट दिग्दर्शित केलेत. पण नंतर दीपकच्या वैवाहिक आयुष्यात अशी घटना घडली, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
दीपक तिजोरी आणि शिवानी तोमरचं नातं हे कायदेशीर गुंतागुंतीचं होतं. २०१७ मध्ये शिवानीने त्याला गोरेगावच्या घरातून हाकलून लावल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं होतं. याचं कारण म्हणजे, तिला अभिनेत्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. यानंतर तिजोरीने त्याची कायदेशीर परिस्थिती समजून घेण्यासाठी वकिलाचा सल्ला घेतला. तेव्हा त्याला कळलं की, शिवानीने तिच्या पहिल्या पतीला कधीच घटस्फोट दिला नव्हता.
शिवानी तोमरची बहीण आणि अभिनेत्री कुनिका सदानंदने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याचे हे दावे फेटाळून लावले होते. याबद्दल ती म्हणालेली, “एखादी व्यक्ती २६ वर्षे सोबत राहू शकते आणि अचानक त्याला कळते की त्याचे लग्न अवैध आहे? मला खात्री आहे की, त्यामागे कोणीतरी आहे. न्यायालय पुराव्यांच्या आधारे निर्णय घेईल.” तसंच पोटगी न दिल्यामुळे अशा गोष्टी माध्यमांमध्ये पसरवल्या जात असल्याचेही तिने म्हटले होते.
दीपकला शिवानीने घरातून हाकलून दिल्याच्या वृत्ताचेही कुनिकाने खंडन केले होते. तो त्याच घरात काही वेळ राहायचा तर बाकी वेळ गर्लफ्रेंडबरोबर राहायचा, असं तिने म्हटलं होतं. शिवानी त्याला कशी घराबाहेर काढू शकते? तो तिच्या बाळाचा बाबा आहे. घरात त्याची स्वतःची खोली आहे,” असं कुनिकाने म्हटलं होतं. दरम्यान, वाद वाढल्यानंतर शिवानीने या प्रकरणावर मौन सोडलं होतं आणि दीपकच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.