Sonakshi Sinha Lovestory : बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी गेल्या वर्षी २३ जून रोजी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. नुकतंच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. सात वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीनं त्यांनी लग्न केलं. त्याच दिवशी या जोडप्यानं भव्य रिसेप्शन पार्टीही आयोजित केली होती.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लव्हस्टोरीत एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याची महत्त्वाची भूमिका आहे आणि हा अभिनेता म्हणजे सलमान खान. स्वत: सोनाक्षीनं याबद्दल सांगितलं आहे. सलमान आमच्या नात्याचा सूत्रधार असल्याची प्रतिक्रिया सोनाक्षीनं नुकतीच एका मुलाखतीत दिली. सलमान खानच्या घरी एका पार्टीत सोनाक्षी व झहीर यांची भेट झाली आणि नंतर दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली.
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीला सलमान खानविषयी विचारण्यात आले. तिच्या लग्नाबद्दल सलमानला माहीत होते का? आणि त्यावर त्याची काय प्रतिक्रिया होती, असा प्रश्न सोनाक्षीला विचारण्यात आला. यावेळी सोनाक्षी म्हणाली, “सलमान खान खूप आनंदी होता. मला तो खूपच आवडतो. त्याच्यामुळेच झहीर आणि माझी भेट झाली. आमच्या लग्नाचं श्रेय त्यालाही जातं. त्यानंच आमचं नातं जुळवून आणलं का? तर तसं नाही. पण, त्याच्याकडे एका पार्टीत मी झहीरला भेटले. त्यामुळे त्याला मध्यस्थ म्हणू शकतो.”
सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम पोस्ट
पुढे सोनाक्षीनं सांगितलं, “झहीरनं मला खूप रोमँटिक पद्धतीनं प्रपोज केलं होतं. आम्ही फिनलँडमध्ये सुटीसाठी गेलो होतो. तेव्हा झहीरनं मला नॉर्दर्न लाइट्सच्या उजेडात प्रपोज केलं. मला वाटलं की, तो मस्करी करीत आहे. कारण- झहीर अनेकदा अशी मस्करी करतो. त्याबद्दल मला तेव्हा काही कल्पना नव्हती; पण तो क्षण माझ्यासाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हता. माझ्याकडे त्या खास क्षणांचा एकही फोटो नाही; पण तो क्षण माझ्या मनात अजूनही आहे.”
सोनाक्षीनं सलमान खानबरोबर ‘दबंग’ चित्रपटात काम केलं आहे. तिच्या या अनुभवाबद्दल सोनाक्षी म्हणाली, “मला ‘दबंग’ चित्रपटाच्या सेटवरचा पहिला दिवस आठवतो. तेव्हा मला कुठे आणून उभं केलं आहे, असं वाटत होतं. मला तेव्हा त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. मी त्यासाठी कोणती तयारी वगैरेही केली नव्हती; पण तेव्हा नियतीच्या मनात काहीतरी असावं. त्यानंतर एकामागून एक गोष्टी घडून आल्या.”
सोनाक्षी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती आणि झहीर एकमेकांबरोबरचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या या व्हिडीओंना चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असतो. दरम्यान, सोनाक्षी लवकरच ‘निकिता रॉय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तिचा भाऊ कुश सिन्हानं केलं आहे. या चित्रपटात तिच्यासह अर्जुन रामपाल आणि परेश रावल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.