धर्मेंद्र यांच्याशी अत्यंत वादग्रस्त परिस्थितीत लग्न करण्यापूर्वी, हेमा मालिनी अभिनेते संजीव कुमार यांच्याबरोबर नात्यात होती. दोघांचं लग्न होणार होतं, पण ऐनवेळी हेमा मालिनींनी नकार दिला. कारण हेमा यांनी लग्नानंतर अभिनय सोडून संसार करावा, असं संजीव कुमार यांचं म्हणणं होतं. खरं तर संजीव कुमार यांना लग्न करण्यात फार रस नव्हता, कारण त्यांच्या हृदयाची स्थिती आणि लाइफस्टाईल याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे अशा परिस्थितीत लग्न करणं जोडीदारासाठी योग्य नसेल, असं त्यांना वाटत होतं.

संजीव कुमार यांचं हेमा मालिनींवर खूप प्रेम होतं, त्यामुळे ते लग्न करायला तयार झाले. संजीव कुमार यांची भाची जिग्ना आणि सिनेपत्रकार हनीफ झवेरी यांनी याबद्दल एका मुलाखतीत सांगितलंय. हेमा व संजीव वेगळे झाले, याचा त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यावर परिणाम झाला.

का वेगळे झाले संजीव कुमार-हेमा मालिनी?

“संजीव यांना दुसऱ्या कोणाचे आयुष्य बरबाद करायचे नव्हते, कारण त्यांना ३० व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. पण ते हेमा मालिनीबद्दल गंभीर होते. त्यांनी हेमाच्या आईची भेट घेतली होती. हेमाच्या आईने एक अट घातली की लग्नानंतर हेमा चित्रपटांमध्ये काम करणं थांबवणार नाही. आणि संजीव कुमार त्यासाठी तयार नव्हते. यामुळे ते वेगळे झाले,” असं जिग्ना व हनीफ म्हणाले.

..अन् धर्मेंद्र व हेमा पडले प्रेमात

हेमा त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. त्यामुळे संजीव मत बदलतील, असं त्यांना वाटत होतं. पण तसं झालं नाही. संजीव कुमार यांनी हेमा मालिनींबरोबर चित्रपट करण्यास नकार दिला. नंतर दोघांनीही हा चित्रपट केला नाही. संजीवपासून वेगळे झाल्यावर हेमा धर्मेंद्र यांच्याबरोबर ‘सीता और गीता’मध्ये काम करत होत्या. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

हेमा व संजीव यांचा ‘तो’ चित्रपट

“धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्याबद्दल अफवा होत्या, पण त्यावेळी हेमा संजीव कुमारच्या प्रेमात होत्या,” असे ते म्हणाले. ब्रेकअपनंतर संजीव कुमार यांची अवस्था वाईट झाली होती. संजीव कुमार यांनी त्रिशुल चित्रपट एका अटीवर केला होता की ते हेमाबरोबर स्क्रीन शेअर करणार नाही. यश चोप्रांनी सांगितलं की दोघांचा फक्त शेवटी एक सीन एकत्र असेल, पण यात त्यांना एकमेकांशी बोलावं लागणार नाही. त्यानंतर संजीव हा सिनेमा करायला तयार झाले होते.

धर्मेंद्र यांनी संजीवबरोबर काम करण्यास दिलेला नकार

हनीफ पुढे म्हणाले, “हेमा व संजीव यांच्या ब्रेकअपचा परिणाम त्या वेळी ते एकत्र करत असलेल्या चित्रपटावर झाला, पण त्याचा परिणाम एका अशा चित्रपटावरही झाला ज्यात हेमा नव्हत्या. हा सिनेमा म्हणजे ‘अपने दुश्मन’ होय. यात धर्मेंद्र होते. धर्मेंद्र यांनी संजीवबरोबर एकाच फ्रेममध्ये दिसण्यास नकार दिला. त्यामुळे, दिग्दर्शकाला दोघांचे सीन वेगळे शूट करावे लागले.”

संजीव कुमार यांच्या अंत्यसंस्काराला गेले नव्हते हेमा-धर्मेंद्र

संजीव कुमार यांचं १९८५ साली निधन झालं. पण संजीव कुमारच्या अंत्यसंस्काराला धर्मेंद्र किंवा हेमा दोघीही गेले नव्हते. धर्मेंद्र व हेमा मालिनी यांनी १९८० साली लग्न केलं. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं होतं. लग्नानंतर हेमा त्यांच्याच घरी राहिल्या, त्या कधीच सासरी गेल्या नाहीत. सध्या धर्मेंद्र त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरबरोबर खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये राहतात, तर हेमा मालिनी एकट्या राहतात.