Met Gala 2025 Diljit Dosanjh Look : प्रसिद्ध गायक व अभिनेता दिलजीत दोसांझच्या ‘मेट गाला’ लूकची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. यंदा अभिनेत्याने पहिल्यांदाच या भव्यदिव्य सोहळ्याच्या रेड कार्पेटवर उपस्थिती लावली होती. दिलजीत ‘मेट गाला’मध्ये पदार्पण करताना कोणता लूक करणार याची त्याच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. अखेर ‘Met Gala 2025’च्या रेड कार्पेटवर दिलजीतने रॉयल पंजाबी लूकमध्ये एन्ट्री घेत सर्वांनाच थक्क केलं. त्याच्या लूकचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे.

न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर पदार्पण करणारा दिलजीत दोसांझ हा पहिला पंजाबी अभिनेता ठरला आहे. त्याने लूकच्या बाबतीत हॉलिवूडच्या अभिनेत्यांनाही मागे टाकलं आहे. दिलजीत दोसांझने रेड कार्पेटवर पंजाबी संस्कृतीचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

दिलजीतचा हा पंजाबी रॉयल लूक फॅशन डिझायनर प्रबल गुरंगने क्रिएट केला आहे. पटियालाचे महाराजा सर भूपिंदर सिंह यांच्यापासून प्रेरित होऊन अभिनेत्याचा हा जबरदस्त लूक डिझाईन करण्यात आला आहे. दिलजीतचा हा शाही लूक सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. या लूकमध्ये सर्वाधिक लक्ष एका खास गोष्टीने वेधून घेतलं आहे.

दिलजीत दोसांझच्या रॉयल केपवर ‘एक ओंकार सतनाम कर्ता पुरख निरवैर अकाल मूरत अजूनी सभम गुरु प्रसाद’ असा गुरुमुखी मंत्र लिहिलेला आहे. हा लूक परिपूर्ण करण्यासाठी अभिनेत्याने पारंपरिक दागिने परिधान केले आहेत. याशिवाय त्याच्या हातात तलवार देखील पाहायला मिळत आहे.

दिलजीत दोसांझच्या या रॉयल लूकच सध्या सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये दिलजीतचा लूक पाहून त्याला मेट गालाचा खरा ‘किंग’ म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दिलजीत दोसांझप्रमाणे यंदा शाहरुख खान, कियार अडवाणी यांनी देखील मेट गालाच्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं आहे. तर, बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने यंदा पाचव्यांदा ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली.