‘राज’ चित्रपटातून भेटीस आलेला अभिनेता डिनो मोरिया सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे. मिठी नदी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी त्याच्या घरावर छापा टाकला. याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थी व दोन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबईत पूर प्रतिबंधक गाळ पुशर आणि ड्रेनेज कामांसाठी वाटप केलेल्या ड्रेजिंग मशीनच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे पुरावे गोळा करण्यासाठी ईडीचे अधिकारी आर्थिक कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक डेटा आणि व्यवहारांच्या नोंदी तपासत आहेत. याप्रकरणी ईडीने शुक्रवारी मुंबई आणि कोचीमधील १५ ठिकाणी छापे टाकले. ज्यात मोरिया, बीएमसीचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे आणि अनेक कंत्राटदारांच्या मालमत्तांचा समावेश आहे.

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अलीकडील तपासणीत गाळ काढण्याच्या कामात तफावत आढळून आली. या निष्कर्षांमुळे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. ज्यामध्ये बीएमसी अधिकारी आणि खाजगी कंत्राटदारांचा समावेश आहे.

डिनो मोरियाची नुकतीच २६ मे रोजी आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) चौकशी केली. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, EOW च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मिठी नदी घोटाळ्यातील आरोपी केतनशी डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो यांनी अनेक वेळा फोनवर बोलल्याचे आरोप आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संपूर्ण प्रकरणी केतन कदम आणि जय जोशी हे मुख्य आरोपी असल्याचे सांगितलं जात आहे. तर डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅंटिनो मोरिया यांच्या नावांचाही समावेश आहे. या गैरव्यवहारामुळे पालिकेला ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. त्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी कथित गैरव्यवहारसंबंधी आर्थिक व्यवहारांची पडताळणी सुरू आहे. त्यासाठी हे छापे टाकण्यात आले आहेत.