अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर बहिणी सोनम कपूर आणि रिया कपूरइतका स्टायलिश नाही. तो कॅज्युअल कपड्यांमध्ये राहणं पसंत करतो. पण चुलत बहीण अंशुला कपूरच्या साखरपुड्यात तो कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसला. त्यानंतर त्याला ट्रोल केलं गेलं. या ट्रोलिंगवर हर्षवर्धनने प्रतिक्रिया दिली आहे.
हर्षने या कार्यक्रमात पांढरा टी-शर्ट, सैल ट्रॅक पँट आणि कॅज्युअल ब्लॅक जॅकेट घातले होते. आणि केस बांधले होते. एकीकडे कपूर कुटुंबातील सर्वजण या समारंभात छान नटून-थटून आल्याने हर्षवर्धनचा लूक वेगळा ठरला. त्याचे कपडे पाहून त्याला ट्रोल करण्यात आलं.
“तुझ्या बहिणीच्या स्टायलिस्टपैकी एखाद्याला तू तुझ्या चुलत बहिणीच्या खास दिवसासाठी ड्रेस तयार करायला का सांगितलं नाहीस?” अशी कमेंट एका युजरने केली. तर दुसऱ्या एका युजरने सोनमचा उल्लेख करत लिहिलं, जी तिच्या फॅशन स्कील्ससाठी ओळखली जाते, तिची पर्सनल स्टायलिस्ट तिची बहीण रिया आहे. तिने केवळ सोनमलाच नव्हे तर आलिया भट्ट आणि करीना कपूर सारख्या आघाडीच्या कलाकारांनाही स्टाइल केलं आहे. पण भावाला मात्र स्टायलिश कपडे दिले नाहीत.
हर्षवर्धन कपूरने दिलं स्पष्टीकरण
हर्षवर्धनने या टीकेला उत्तर दिलं आणि कमेंटमध्ये त्याची भूमिका स्पष्ट केली. “माझ्यासाठी काही फॉर्मल ड्रेस पाठवण्यात आले होते. पण या वर्षाच्या अखेरीस आणि पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला चित्रित होणाऱ्या एका प्रकल्पासाठी मी वजन कमी केले आहे. त्यामुळे ते कपडे मला नीट बसत नव्हते. कार्यक्रमासाठी खूप कमी वेळ शिल्लक होता आणि उशीर होऊ नये म्हणून, मी काहीतरी बेसिक आणि आरामदायक कपडे घालायचं ठरवलं,” असं हर्षवर्धनने लिहिलं.
नेटकऱ्यांना त्याचं स्पष्टीकरण पटलं नाही. त्यांनी त्याच्या कमेंटवर ट्रोल केलं आणि लिहिलं, “त्याला अटेंशन हवं होतं,” दुसऱ्या युजरने म्हटलं, “त्याच्याकडे बेसिक पॅन्ट आणि शर्ट नसेल का, सर्वात वाईट म्हणजे? मला विश्वास बसत नाही की पारंपरिक ड्रेस बसत नव्हता म्हणून हा एकमेव पर्याय म्हणजे हे कपडे,” तर एकाने म्हटलं, “हे कपडे तुला कुठे व्यवस्थित बसतात, तेही सैलच आहेत ना. त्यापेक्षा शेरवानीच घालायची ना.”
अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन, शेवटचा वडिलांबरोबर राज सिंग चौधरी यांच्या अॅक्शन थ्रिलर ‘थार’मध्ये दिसला होता. हा सिनेमा २०२२ मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. हर्षवर्धनने निर्माता म्हणूनही काम केलं आहे. आता पुढे तो कोणत्या प्रकल्पात काम करणार आहे याची माहिती अद्याप आलेली नाही.
हर्षची चुलत बहीण अंशुला आणि रोहन ठक्कर यांचा ‘गोळ धाणा’ समारंभ २ ऑक्टोबर रोजी पार पडला. या समारंभाला जवळच्या मित्रमंडळी आणि कपूर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. अंशुला ही अनिल कपूरचे मोठे भाऊ आणि निर्माते बोनी कपूर यांची मुलगी आहे.