फरहान अख्तरच्या आईच्या ड्रायव्हरने त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. मुंबई पोलिसांनी फरहान अख्तरची आई, हनी इराणीचा ड्रायव्हर नरेश सिंह आणि पेट्रोल पंप कर्मचारी अरुण सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी फ्यूएल कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. ड्रायव्हरने वांद्रे येथील पेट्रोल पंपावर गाडीमध्ये इंधन न भरता वारंवार कार्ड स्वाइप केल्याची माहिती समोर आली आहे.
वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अख्तर कुटुंबाची १२ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. एफआयआर (क्रमांक १६६८/२०२५) नुसार, हनी इराणीच्या मॅनेजर दिया भाटिया यांनी १ ऑक्टोबर २०२५ रोजी यासंदर्भात तक्रार दाखल केली.
तक्रारीत म्हटलंय की, चालक नरेश रामविनोद सिंहने पेट्रोल पंपावरील कर्मचारी अरुण अमर बहादूर सिंह याच्याबरोबर संगनमत करून एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान या फ्यूएल कार्डचा गैरवापर केला. मुंबई पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या संबंधित कलम ३(५), ३१६(२), आणि ३१८(४) अंतर्गत फसवणूक आणि विश्वासघात या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
चालकाने फसवणूक कशी केली?
एफआयआरमधील तपशीलांनुसार, “आरोपींनी वांद्रे येथील पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये इंधन न भरता वारंवार कार्ड स्वाइप केले. पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने या बनावट व्यवहारांच्या बदल्यात चालकाला रोख रक्कम पुरवल्याचा आरोप आहे.” फरहान अख्तरच्या कुटुंबाच्या मालकीच्या वाहनांमध्ये इंधनाशी संबंधित नोंदींमध्ये अनियमितता आढळली, त्यानंतर चालक व पेट्रोल पंपावरील कर्मचारी मिळून करत असलेली ही फसवणूक उघडकीस आली.
यासंदर्भात फरहान अख्तर व कुटुंबियांनी अधिक पडताळणी केली. तेव्हा समजलं की कारच्या टाकीची ३५ लिटरची क्षमता असूनही, त्यात ६२ लिटरपर्यंत इंधन भरले गेले. चौकशी केल्यानंतर, चालकाने गैरव्यवहाराची कबुली दिली. तसेच तो तीन वर्षांहून अधिक काळापासून या फ्यूएल कार्डचा गैरवापर करत असल्याचं त्याने मान्य केलं. तीन वर्षांत फरहान अख्तरच्या कुटुंबाचं एकूण १२ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.