Actor Who left penniless by wife: १९८० च्या दशकात मॉडेलिंगच्या जगात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेता दीपक पाराशर यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यांनी अनेक लोकप्रिय अभिनेत्रींबरोबर काम केले. मात्र, चित्रपटसृष्टीतील तो सर्वोत्तम काळ नव्हता. तो काळ हिंदी चित्रपट इतिहासातील सर्वात वाईट काळ मानला जात होता.
दरम्यानच्या काळात दीपक यांना रामसे बंधूंनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेल्या बी-ग्रेड हॉरर चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडले. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील मोठे संकट आले. त्यांची पत्नी त्यांना सोडून निघून गेली. ते त्यांच्या मुलीसह एकटे राहिले. ते त्यांच्या पत्नीला गेल्या अनेक दशकांपासून भेटले नाहीत.
आता दीपक पाराशर यांनी नुकतीच विकी लालवाणीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, मी अमिताभ बच्चन यांचा स्पर्धक आहे अशा काही बातम्या छापून आल्या होत्या. पण, माझा त्या बातम्यांशी संबंध नव्हता. मी याबद्दल अमिताभ बच्चन यांनासुद्धा भेटून या गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत जितके यश पाहिले होते तितके यश दीपक यांनी कधीही पाहिले नाही. यशाची ती उंची त्यांना गाठता आली नाही. त्यानंतर त्यांनी रामसे बंधूंबरोबर काम करण्यास सुरुवात केली.
“अपघातात माझ्या पायाला ३८० टाके…”
दीपक पाराशर म्हणाले, “रामसे यांना बरीच मुले होती आणि ते सर्व चित्रपट बनवत होते. मी एका मुलाचा चित्रपट केला आणि त्यानंतर इतर सहा चित्रपटांच्या मला ऑफर मिळाल्या. मी भावनिक व्यक्ती असल्याने त्यांना नाही म्हणू शकलो नाही. ते ए ग्रेड चित्रपट नाहीत हे माहीत असूनदेखील मी त्या चित्रपटात काम केले. माझ्या भावनांमुळे मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही. पण, त्यानंतर मला तशाच पद्धतीच्या भूमिकांसाठी विचारणा झाली. पण, हे विसरून चालणार नाही की माझा त्यावेळी अपघात झाला होता, माझा पाय जवळजवळ कापला गेला होता.”
पुढे पत्नीपासून विभक्त झाल्याबद्दल अभिनेते म्हणाले, “अपघातात माझ्या पायाला ३८० टाके पडले होते. त्यावेळी माझी पत्नी ८ महिन्यांची गर्भवती होती. मी दुबईहून भारतात परत आलो. त्यानंतर तिचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचे मला जाणवले. आमच्या नात्यात रिकामेपण जाणवू लागला. एक दिवस ती माझ्याकडे आली आणि म्हणाली की, मी फक्त तुझ्या ग्लॅमरसाठी तुझ्याशी लग्न केले होते.
“ती सर्वकाही घेऊन गेली…”
“माझा पाय निरुपयोगी झाला आहे असे डॉक्टरांनी सांगितले होते, त्यामुळे तिला वाटले की सेलिब्रिटींमध्ये जाता येणार नाही. मला वाटले की ती तिच्या विधानांबाबत फार गंभीर नाही. ती काही दिवसांत परत येईल, पण तसे झाले नाही, ती परत आली नाही; पण जाताना ती सर्वकाही घेऊन गेली होती.
माझ्या आईला काही पैशांची गरज होती, तर मी तिला सांगितले की तू कपाटातील पैसे घे. तिने कपाट उघडले, पण तिथे काहीच नव्हते. मी तिला सांगितले की बँक लॉकरमधून पैसे आण. तिथेदेखील काहीच नव्हते. सगळे पैसे, दागिने, सोने ती घेऊन गेली होती. ती सर्वकाही घेऊन गेली होती आणि माझ्याकडे काहीच उरले नाही. इतकेच नाही तर तिने इंडस्ट्रीमध्ये काही अफवादेखील पसरवल्या होत्या.”
दीपक पाराशर यांनी त्या अफवा काय होत्या याबद्दल वक्तव्य केले नाही. पण, त्यांच्या लैंगिकतेबद्दल अनेकदा बोलले जाते. बिग बॉसमध्ये ते त्यांच्या लैंगिकतेबद्दल बोलले होते, त्याचा परिणाम करिअरवर झाला का? यावर ते म्हणाले, “मी कोणासमोरही माझी लैंगिकता जाहीर केलेली नाही, कारण मला त्याची गरज वाटत नाही. हेही तितकेच खरे आहे की, मी समलैंगिक नाही. समलैंगिक असण्यात काहीही चूक नाही. या इंडस्ट्रीमध्ये असे बरेच लोक आहेत जे समलैंगिक आहेत. त्यांच्या कारकिर्दीला कलंक लागलेला नाही, त्यामुळे एका विधानामुळे माझ्या करिअरवर परिणाम झाला असे मला वाटत नाही”, असे म्हणत समलैंगिक नसल्याचे दीपक पाराशर म्हणाले.
दरम्यान, गेल्या वर्षी एका मुलाखतीत अभिनेते म्हणालेले, “मी सर्वांच्या प्रेमात पडतो. मनाने व्यक्ती चांगली असायला हवी. त्या व्यक्तीने माझ्याशी प्रामाणिक असले पाहिजे. स्त्री असो किंवा पुरुष त्याने मला काही फरक पडत नाही.” बिग बॉसमध्येदेखील त्यांनी अशाच प्रकारची काही विधाने केली होती.