Asrani lifelong bond with Jaya Bachchan: दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी यांचे २० ऑक्टोबरला निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांनी अनेक चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. ‘अभिमान’ आणि ‘छोटीसी बात’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या होत्या. ‘शोले’मधील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

गोवर्धन असरानी यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया(FTII) मधून अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला मुंबईत काम मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिक्षकाची नोकरी करण्यास सुरुवात केली. जया बच्चन (त्यावेळच्या जया भादुरी) त्यांच्या विद्यार्थिनी होत्या. स्क्रीन ॲक्टिंग कोर्सचे त्या प्रशिक्षण घेत होत्या. त्यावेळी ‘गुड्डी’ या चित्रपटासाठी कलाकारांचे कास्टिंग सुरू होते. चित्रपट निर्माते हृषिकेश मुखर्जी यांनी असरानी यांना जया यांच्याबद्दल विचारले होते. त्यांना गुलजार यांनी अभिनेत्रीचे नाव सुचवले होते.

“आजही जेव्हा मला जया…”

२०१६ मध्ये असरानी यांनी सिनेस्तानला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी ‘गुड्डी’ चित्रपटाच्या कास्टिंगचा किस्सा सांगितला होता. ते म्हणालेले, “हृषिदादांनी मला विचारले होते की जया कुठे आहे? त्यावेळी मी त्यांना कॅन्टीनकडे इशारा करत ती चहा पिण्यासाठी गेली असल्याचे सांगितले. अनिल धवन आणि डॅनीदेखील तिथे होते. जेव्हा मी जयाला सांगितले की हृषिकेश मुखर्जी तिला भेटण्यासाठी आले आहेत, त्यावेळी तिच्या हातातून कप खाली पडला. जेव्हा ते जयाबरोबर बोलत होते, तेव्हा मी गुलजार यांनी मला भूमिका द्या, असे सांगितले. त्यावेळी गुलजार यांनी मला हळूच सांगितले की एक भूमिका आहे, पण हृषिदादांना सांगू नको की मी तुला याबद्दल सांगितले आहे.”

‘गुड्डी’ हा चित्रपट गाजला. या चित्रपटामुळे असरानी आणि त्यांची विद्यार्थिनी दोघांना प्रसिद्धी मिळाली. हळूहळू असरानी व जया बच्चन यांच्यातील बॉण्डिंग उत्तम झाले. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन व जया यांच्या लग्नात तिच्या भावाचे कर्तव्य पार पाडले होते, असे वक्तव्य त्यांनी केले होते. ते म्हणालेले, “आजही जेव्हा मला जया भेटते, तेव्हा मला सर असे म्हणते, कारण कधीकाळी मी तिचा शिक्षक होतो. तिच्या लग्नात तिचे ज्या चार भावांनी नवरीच्या भावाची कर्तव्ये पार पाडली, त्या चारपैकी मी एक होतो. गुलजार साहेब, रमेश बेहल, तिचा एक भाऊ आणि मी असे नवरीचे चार भाऊ होतो. एका खासगी कार्यक्रमात संजय गांधींनीदेखील हजेरी लावली होती.”

असरानी यांनी इंदिरा गांधींची एक आठवण सांगितली होती. बॉलीवूड ठिकाणाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणालेले की, मी तरुण होतो, मुंबईत आल्यानंतर मला भूमिका मिळेल या आशेने मी संगीत दिग्दर्शक नौशाद यांना शोधत होतो; पण यश मिळाले नाही. मी पुन्हा माझ्या गावी परतलो. तिथे माझ्या पालकांनी आमच्या कारपेट व्यवसायात काम करावे असे सुचवले. पण, माझी स्वप्ने वेगळी होती. मी एफटीआयआयसाठी अर्ज केला आणि पहिल्या बॅचमध्ये मला प्रवेश मिळाला.

संघर्षाच्या दिवसांबद्दल ते म्हणालेले, “मी माझे सर्टिफिकेट घेऊन मला काम मिळेल या आशेने सगळीकडे फिरायचो, पण लोक मला हाकलून द्यायचे. ते मला म्हणायचे की, अभिनय करण्यासाठी सर्टिफिकेट लागत नाही. मोठे कलाकार इथे प्रशिक्षण घेत नाहीत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी कामाच्या शोधात दोन वर्षे फिरत होतो. एक दिवस इंदिरा गांधी पुण्याला आल्या, त्यावेळी त्या इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मंत्री होत्या. आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली. आमच्याकडे सर्टिफिकेट असूनही कोणीही आम्हाला वेळ देत नाही. त्यानंतर त्या मुंबईला गेल्या. त्यांनी निर्मात्यांना आम्हाला काम देण्यास सांगितले. त्यानंतर आमच्याकडे काम येण्यास सरुवात झाली. जयाला आणि मला ‘गुड्डी’ चित्रपटात कास्ट केले. जेव्हा तो चित्रपट गाजला, तेव्हा लोक एफटीआयआयकडे गांभार्याने पाहू लागले.”

दरम्यान, त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.